भरधाव कारने फुटपाथवर चढून 5 पदचारी महिलांना चिरडलं; घटना CCTV मध्ये कैद
Mangalore Accident : कर्नाटकातील या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये भरधाव कारने पाच मुलींना चिरडलं आहे.
Mangalore Horrifying Accident : देशभरात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. वाहन चालकांच्या चुकीमुळे अनेकदा पादचाऱ्यांचा जीव गेला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता बेदरकारपणे गाडी चालवल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच कर्नाटकमधील मंगळुरु (Mangalore) जिल्ह्यात भीषण अपघताची घडना घडली आहे. या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. मंगळुरुमध्ये एका भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकांना चिरडलं आहे. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फूटपाथवरून चालणाऱ्या पाच महिलांना भरधाव कारने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. कर्नाटकातील मंगळुरु येथील लेडी हिल येथे हा अपघात झाला.
प्रामुख्याने फुटपाथ हा लोकांना चालण्यासाठी असतो. मात्र मंगळुरुमध्ये घडलेल्या घटनेमुळे आता फुटपाथवरुन चालणंही अवघड झालं आहे. मंगळुरुच्या लेडी हिल येथे फूटपाथवरून चालत असलेल्या पाच महिलांना मागून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. यानंतर कार न थांबता तिथून लगेच निघून गेली. या घटनेत रूपश्री (23) नावाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर स्वाती (26), हितानवी (16), कार्तिका (16) आणि याथिका (12) या मुली जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सिटीझन मूव्हमेंट ईस्ट बेंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. आता फूटपाथवरून चालणेही सुरक्षित राहिलेले नाही, असे लोकांनी म्हटलं आहे. "ड्रायव्हरने सावधपणे गाडी चालवल्यास असे अपघात टाळता येतील, अशी प्रतिक्रिया एका युजनरे दिली आहे. दुसऱ्या एका युजरने सार्वजनिक रस्त्यांवर वेग मर्यादा राखली पाहिजे, असं म्हटलं आहे.
या घटनेत चालकाचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. अपघातानंतर कार चालकाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातप्रकरणी पांडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश बलदेव असे या कार चालकाचे नाव आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दोन महिला आणि तीन मुली फूटपाथवरून चालत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली होती. पोलिसांनी कमलेशविरुद्ध कलम 279, 337, 338, 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.