`अतुल्य भारत` थीमवर आधारित सर्वात मोठी भेटवस्तू; इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंद
अतुल्य भारत थीमवर बनवण्यात आलेला देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा-लांब एक्सप्लोजन बॉक्स
मँगलोर : कर्नाटकातील मँगलोरमध्ये एका विद्यार्थिनीने अतुल्य भारत थीमवर आधारित एक अनोखी भेटवस्तू तयार केली आहे. ही भेटवस्तू म्हणजे एक्सप्लोजन बॉक्स आहे. या गिफ्टसह इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book of Records)विद्यार्थीनीच्या नावची नोंद केली गेली आहे. या गिफ्टचं वैशिष्ट्ये म्हणजे, अतुल्य भारत या थीमवर बनवण्यात आलेला देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा-लांब एक्सप्लोजन बॉक्स (Explosion Box) आहे.
अपेक्षा कोट्टारी असं सर्वांत लांब एक्सप्लोजन बॉक्स तयार करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे. अपेक्षा Besant Evening College मधून पदव्युत्तर (PG - Post Graduation)शिक्षण घेत आहे. शिक्षणासह ती घरी लहान मुलांच्या शिकवण्याही घेते.
या एक्सप्लोजन बॉक्सची लांबी जवळपास एक हजार सेंटीमीटर असल्याचं अपेक्षाने सांगितलं. हा बॉक्स बंद केल्यावर याचं माप २५x२५ सेमी इतकं होतं. 'अतुल्य भारत' थीमवर आधारित या बॉक्समध्ये सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, भारताच्या महान व्यक्ती आणि भारताचे स्वातंत्र्य सेनानी यांचे फोटो आणि माहिती देण्यात आली आहे.
लहानपणापासून क्राफ्ट वस्तू बनवण्यास आवडतात. अनेकदा मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना त्यांच्या वाढदिवशी किंवा इतर काही समारंभावेळी स्वत: गिफ्ट्स, क्राफ्टच्या भेटवस्तू तयार करुन देत असल्याचं अपेक्षाने सांगितलं.
त्यानंतर या आवडीमुळे हळू-हळू यू-ट्यूबवर व्हिडिओ बघत-बघत गिफ्ट बॉक्स आणि आणखी काही वस्तू बनवण्यास सुरुवात केली. याआधीदेखील एक्सक्लूसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नावाची नोंद असल्याचं अपेक्षा म्हणाली.
आतापर्यंत ३५ हून अधिक विविध प्रकारची गिफ्ट तयार केली आहेत. पण यावेळी खास डिझाइनमुळे हा अनोखा रेकॉर्ड झाला. आता पुढे गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करणार असल्याचं अपेक्षाने सांगितलं.