भयंकर! भूस्खलनात सैन्याचा कॅम्प उद्ध्वस्त, 55 जवान ढिगाऱ्याखाली, 20 बेपत्ता
अस्मानी संकट! मध्यरात्री सैन्याच्या कॅम्पवर भूस्खलन, मृत जवानांचा आकडा वाढण्याची भीती
मणिपूर : आसाममध्ये महापुराचं भीषण संकट आहे. तर दुसरीकडे मणिपूरमध्ये सैन्याच्या जवानांवरच अस्मानी संकट ओढवलं आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सैन्याच्या कॅम्पवर भूस्खलन झालं. या भूस्खलनात 55 जवान अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं.
मणिपूर जिल्ह्यातील नोनी जिल्ह्यात ही भीषण दुर्घटना घडली आहे. या भूस्खलनात 2 जवानांचा मृत्यू झाला. तर 13 जवानांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. इंफाळपासून 50 किमी दूर नोनी जिल्ह्यात ही घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार केला जात होता. त्याच्या सुरक्षेसाठी 107 टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री या परिसरात मोठं भूस्खलन झालं. ज्यात अनेक जवान गाडले गेले.
गुरुवारी सकाळी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केले. ज्यामध्ये साइटवर उपलब्ध इंजिनीअरिंग उपकरणे वापरून बचावकार्य सुरू आहे.
जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर हेलिकॉप्टर देखील बचावकार्यात मदत करत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.