Manipur Violence Man shot 17 Times: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यानच्या (Manipur Violence) धक्कादायक घटना समोर येत असताना या संघर्षातील काही थक्क करणारे किस्सेही चर्चांचा विषय ठरत आहे. राज्यात सुरु असलेल्या याच जातीय संघर्षामध्ये एक 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला 17 गोळ्या मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाच्या शरीरामधून 13 गोळ्या काढण्यात आल्या असून पुढील उपाचारांसाठी त्याला शेजारचं राज्य असलेल्या मिझोरममध्ये हलवण्यात आलं आहे. येथील सरकारी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 


शरीरातून काढल्या 13 गोळ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी या तरुणाला हिंसाग्रस्त राज्यातील रुग्णालयामधून हलवण्यात आलं आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचं नावं पोगिनमुआन असं आहे. त्याला अधिक चांगल्या उपचारांसाठी रविवारी चुराचंदपूर जिल्ह्यातील रुग्णालयामधून मिझोरममधील आइजोल येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. 3 मे रोजी पोगिनमुआनच्या गावात हिंसाचार झाला तेव्हा एका देशी पिस्तुलमधून त्यावर तब्बल 17 गोळा झाडण्यात आल्या. या गोळ्या पोगिनमुआनच्या पाठीवर आणि मानेवर लागल्या. यापैकी 4 गोळ्या चुराचंदपूर येथील रुग्णालयामध्येच ऑपरेशन करुन शरीरामधून बाहेर काढण्यात आल्या. मात्र चुराचंदपूरमधील रुग्णालयामध्ये पाठीच्या कण्याजवळ लागलेल्या गोळ्या काढण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नव्हती. त्यामुळेच पोगिनमुआनला आइजोल येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. या तरुणावर वेगवेगळ्या वेळी केलेल्या ऑपरेशनमध्ये शरीरामधून 13 गोळ्या काढण्यात आल्या आहेत.


गावाचं संरक्षण करत होतो असा दावा


सोमवारी पोगिनमुआनला ऑपरेशनसाठी नेलं जात अशताना अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी चर्चा केली. मणिपूरमधील चिन-कुकी-मिजो या जमातीमधील सदस्य असलेल्या पोगिनमुआनने आपण मित्रांच्या मदतीने गावाचं संरक्षण करत होतो, असा दावा केला आहे. अधिकाऱ्यांना पोगिनमुआनने दिलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी 'आदिवासी एकजुटता मोर्चा' संपल्यानंतर काही समाजकंटकांनी पोगिनमुआन आणि त्याच्या मित्रांवर गोळीबार केला. पोगिनमुआनने केलेल्या दाव्यानुसार त्याचे मित्र या हल्ल्यामध्ये मारले गेले. 17 गोळ्या लागल्यानंतरही आपण सुदैवाने बचावलो असं पोगिनमुआनने म्हटलं आहे.



1700 घरं जाळली


समोर आलेल्या माहितीनुसार अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा या मागणीसाठी मेइती समुदायातील लोकांच्या मागणीला विरोध करण्यासाठी 3 मे रोजी डोंगराळ भागातील 10 जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकजुटता मार्च' आयोजित करण्यात आल्यानंतर राज्यात हिंसक आंदोलन झाली. या हिंसाचारामध्ये किमान 73 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत. धार्मिक स्थाळांबरोबर वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 1700 हून अधिक घरं जाळण्यात आली.