पर्रिकरांची प्रकृती स्थिर, गोव्यात भाजपच्या आमदारांची तातडीची बैठक
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती जैसे थे आहे.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती जैसे थे आहे. पर्रिकर यांच्यावर गोव्यातील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगानं ग्रस्त आहेत. 23 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता पोटामध्ये रक्तस्राव झाल्यानं त्यांना तातडीनं गोव्यातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनतर देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे एम्सच्या डॉक्टराना गोव्यात बोलावण्यात आलं असून एम्समधील डॉक्टरानी त्यांच्या काही औषधांमध्ये बदल केला आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे पर्रिकर यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून असून पर्रिकर यांची तब्बेत स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज गोव्यात भाजपच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सकाळी 10 वाजता पणजीमधल्या भाजपच्या मुख्य कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आल्याचं कळतं आहे.
पक्षात आणि राजकारणात देखील मनोहर पर्रिकर यांच्या कामाचं कौतुक होतं. काही दिवसांपूर्वीच गोवा विधानसभेचे उपसभापती आणि भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी म्हटलं होतं की, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर शेवटपर्यंत मुख्यमंत्री कायम राहतील. कर्करोगामुळे त्यांचं आरोग्य सध्या बिघडलं आहे.