एक गाव, दोन घरं आणि 6 हत्या; सूडापोटी अख्खं कुटुंब संपवलं; 20 मिनिटं सुरु होता नरसंहार; सगळं गाव हादरलं
उत्तर प्रदेशातील देवरिया येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येच्या बदला घेण्यासाठी पाच लोकांना ठार करण्यात आलं.
उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील एका घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी पाच लोकांना अत्यंत निर्दयीपणे ठार करण्यात आलं. 5 एकर जमिनीवरुन हा नरसंहार झाल्याची माहिती मिळत आहे. हत्याकांड सुरु असताना गावकरी 100 मीटर अंतरावरुन पाहत उभे होते. या हत्याकांडामुळे दोन कुटुंबं उद्ध्वस्त असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. हत्याकांड पाहिल्यानंतर गावकरी इतके घाबरले होते की, अर्धा तास कोणाचीही घटनास्थळी जाण्याची हिंमत होत नव्हती.
सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी रुद्रपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील फतेहपूर गावात माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने पेटलेल्या कुटुंबीयांनी सत्यप्रकाश दुबे यांच्या घऱावर हल्ला केला. हल्लेखोरांनी फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये संपूर्ण कुटुंबाला ठार केलं. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले होते.
जमिनीच्या वादातून काही मिनिटातं पडला रक्ताचा सडा
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यप्रकाश यांच्या भावाने आपल्या वाट्यातील 5 एकर जमीन प्रेमचंद यांना दिली होती. प्रेमचंद त्याच जमिनीवर शेती करत होते. या जमिनीवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. सत्यप्रकाश यांनी याप्रकरणी कोर्टात केसही दाखल केली होती. वर्षभरापूर्वी पोलीस आणि महसूल विभागासमोर जमिनीच्या वादाची सुनावणी झाली होती. पण त्यानंतरही वाद काही मिटला नव्हता.
त्यातच काही दिवसांपूर्वी सत्यप्रकाश आणि प्रेमचंद यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यानंतर प्रेमचंद यांचा मृतदेह सापडला होता. मृतदेह पाहिल्यानंतर प्रेमचंद यांचे नातेवाईक संतापले होते आणि त्यांनी सत्यप्रकाश यांच्या घऱाच्या दिशेने धाव घेतली. 20 ते 25 लोक हातात काठी, धार शस्त्रं, बंदुका घेऊन सत्यप्रकाश दुबे यांच्या घरात दाखल झाले आणि कुटुंबातील चौघांची हत्या केली.
देवरिया येथे 6 लोकांच्या हत्येप्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सत्यप्रकाश दुबे यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 27 जणांची नावं असून, 50 अज्ञात आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
दुसरीकडे प्रेमचंद्र यादव यांच्या काकाने रुद्रपूर कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये 5 जणांची नावं आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांना सुरक्षेच्या कारणास्तव गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. गावात सध्या तणाव असून, शांतता आहे.
सत्यप्रकाश दुबे यांची मुलगी शोभिताचं लग्न झालं आहे. घटना घडली तेव्हा ती सासरी होती. याशिवाय सत्यप्रकाश दुबे यांचा मुलगा सर्वेश घरात नव्हता यामुळे वाचला आहे. तसंच दुसरा मुलगा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.