वाराणसी: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक होताना दिसत आहे. या स्पर्धेत आता रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. ते शुक्रवारी वाराणसी येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी 'बसपा'च्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर लिंगभेदी टीका करून नव्या वादाला तोंड फोडले. मायावती यांनी लग्न न केल्यामुळे त्यांना नवऱ्याला कसे सांभाळायचे हे माहिती नसल्याचे आठवले यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी मायावती यांनी भाजपमधील विवाहित महिल्या नेत्या आपल्या पतीराजांना नरेंद्र मोदी यांच्यासमोर न्यायला घाबरत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांना भीती वाटते की, मोदींना भेटल्यानंतर आपले पतीही आपल्याला सोडून देतील, असे मायावतींनी म्हटले होते. 


...म्हणून भाजपच्या महिला नेत्या पतीराजांना मोदींसमोर न्यायला घाबरतात- मायावती


मायावतींच्या याच टीकेला आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. मला मायावती यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. मायावती यांनी मोदींच्या पत्नीचा उल्लेख करून टीका केली. परंतु, मायावती यांनीही लग्न केलेले नाही. त्यामुळे त्यांनाही कुटुंब म्हणजे काय असते, हे माहिती नाही. मायवतींनी लग्न केले असते तर नवऱ्याला कसे सांभाळायचे असते, हे त्यांना ठाऊक असते. राजकारणात सभ्यतेची गरज आहे. त्यामुळे कोणीही इतरांच्या कुटुंबीयांवर टीका करू नये, असे आठवले यांनी सांगितले. 


मायावतींना लोकांवर फक्त टीका करता येते. त्या गोंधळलेल्या आणि विचलित अवस्थेत आहेत. त्यामुळे त्या अशाप्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अशाप्रकारे अपमान करता कामा नये, असेही आठवले यांनी सांगितले.