...म्हणून भाजपच्या महिला नेत्या पतीराजांना मोदींसमोर न्यायला घाबरतात- मायावती
निवडणुकीत महिलांनी मतदान करताना या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे.
लखनऊ: भाजपच्या महिला कार्यकर्त्या आपल्या पतीराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर न्यायला घाबरतात. कारण, मोदींना भेटल्यानंतर आपले पतीही त्यांच्याप्रमाणे आपल्याला वाऱ्यावर सोडतील, अशी भीती या महिलांना वाटत असल्याचे वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी केले. त्या सोमवारी मोहनलालगंज येथील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हा किस्सा सांगितला. मला असे समजले आहे की, भाजपमधील विवाहित महिला आपल्या पतीला मोदींसमोर न्यायला घाबरतात. त्यांना भीती वाटते की, मोदींना भेटल्यानंतर आपले पतीही आपल्याला सोडून देतील, असे मायावतींनी म्हटले.
तसेच यंदाच्या निवडणुकीत महिलांनी मतदान करताना या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. मोदींनी वाऱ्यावर सोडलेल्या पत्नीच्या आत्मसन्मानासाठी महिलांनी मोदी आणि भाजपला मत देऊ नये, असेही मायावती यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेत अलवार सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मायावती यांना लक्ष्य केले होते. मायावती या प्रकरणात कारवाई करताना केवळ मगरीचे अश्रू ढाळत असल्याची टीका मोदींनी केली होती. मात्र, मोदी या निर्घृण कृत्याचाही राजकारणासाठी वापर करत असल्याचा पलटवार मायावतींनी केला.
साहजिकच मायावती यांच्या या वक्तव्याचे भाजपमध्ये पडसाद उमटले आहे. केंद्रीय मंत्री अरूण जेटली आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावरून मायावती यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. जेटली यांनी म्हटले की, मायावतींना काहीही करून पंतप्रधानपद मिळवायचेच आहे. त्यांचा कारभार, नैतिकता आणि टीका करण्याची पातळी खूपच खालावली आहे. त्यांनी आज पंतप्रधानांवर केलेली टीका पाहता त्या सार्वजनिक जीवनात वावरण्याच्या योग्यतेच्या नसल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका जेटली यांनी केली.