Budget 2020: मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त लांबलचक, आतून मात्र पोकळ- राहुल गांधी
अर्थसंकल्पात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय दिसून आला नाही.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले अर्थसंकल्पीय भाषण हे इतिहासातील सर्वात लांबलचक भाषण ठरले असेल. मात्र, आतून ते पूर्णपणे पोकळ होते, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे. मात्र, अर्थसंकल्पात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय दिसून आला नाही.
अर्थसंकल्पात केवळ योजना होत्या, त्याला मध्यवर्ती संकल्पनेचा आधार नव्हता. अर्थसंकल्पातील जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती आणि भरकटलेपण सरकारची सध्याची अवस्था स्पष्ट करणारे आहे. सरकारकडून निव्वळ बाता मारल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात काहीच घडताना दिसत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत आणि बांधकाम उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होणे अपेक्षित होते. तसेच वाहननिर्मिती क्षेत्रासाठीही सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या. अर्थसंकल्पानंतर अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येतील, आणि बाजार उसळी घेईल, अशी आशा बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली होती. मात्र गुंतवणूकदारांची सपशेल निराशा झाली. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भांडवली बाजार गडगडताना दिसला.
Budget2020 सादर करण्यासाठी शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमरास Finance minister Nirmala Sitharaman केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत आल्या. सकाळी अकरा वाजण्य़ाच्या सुमारास मंत्रीमंडळ आणि संसदेच्या सर्व सदस्यांसमोर त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने सीतारामन यांनी हा विक्रमी अर्थसंकल्प उलगडला. देशाच्या आकांक्षा, आर्थिक विकास आणि सामाजिक जपणूक हे तीन मुख्य घटक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.