VIDEO: नेहरुंचे `ते` पाप प्रसारमाध्यमांनी इतकी वर्षे लपवून ठेवले; मोदींचा गंभीर आरोप
नेहरूंची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून ती बातमी दडपून टाकण्यात आली.
पाटणा: पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असताना ते एकदा कुंभमेळ्यात आले होते. मात्र, त्यावेळी प्रचंड चेंगराचेंगरी होऊन हजारो जणांचा मृत्यू झाला. यानंतर सरकारने नेहरुंची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी ही बातमी लपवून ठेवली. प्रसारमाध्यमांनीही ही बातमी जगासमोर आणण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते बुधवारी दरभंगा येथील प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी त्यांनी म्हटले की, मला अनेकदा कुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले आहे. मात्र, मी तुम्हाला आज पंडित नेहरू पंतप्रधान असतानाची गोष्ट सांगणार आहे. त्यावेळी नेहरू कुंभमेळ्याला आले होते. ही माहिती गेली पाच-सहा दशके दडवून ठेवण्यात आली होती. त्यावेळी कुंभमेळ्याला लोकांची तितकीशी गर्दीही होत नसे. मात्र, तरीही काँग्रेस सरकारच्या गलथान कारभारामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, सरकारची अब्रू वाचावी आणि नेहरूंची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी त्यावेळी प्रसारमाध्यमांनी ही बातमी दाखवण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. काही वृत्तपत्रांमध्ये लहान बातम्या छापून आल्या. मात्र, या बातम्याही दडपून टाकण्यात आल्या. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना एका पैशाचीही भरपाई मिळाली नाही. तो केवळ एक अपघात नव्हता. अपघातानंतर जे काही घडले तो म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस होता, असे मोदींनी यावेळी सांगितले.
याउलट आमच्या सरकारच्या काळातील कुंभमेळ्याकडे पाहा. यंदा कुंभमेळ्यासाठी करोडो लोक आले होते, पंतप्रधानही हजर होते. मात्र, या सगळ्याचे व्यवस्थितपणे नियोजन करण्यात आले होते, असेही मोदींनी सांगितले.