डेहराढून : उत्तराखंड राज्यात सरकारी कार्यालयात मीडियाला प्रवेश बंदी लागू करण्याचा आदेश मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत सरकारने जारी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंड सरकारने प्रसारमाध्यमांसाठी एक तीन पानांचा आदेश जारी केलाय. उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सरकारी कार्यालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश दिला आहे.


या नव्या सरकारी आदेशानुसार पत्रकारांना सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेय. दरम्यान, आम्हाला गरज पडली किंवा महत्त्वाच्या वेळी गरज असल्यास पत्रकारांना किंवा मीडियाला बोलविले जाईल. ते सुद्धा रिसेप्शन काऊंटरवर पर्यंत मीडियाला येण्याची परवानगी असेल. तेथेच संबंधित अधिकारी मीडियाला माहिती देतील, असा या तीन पानी आदेशात म्हटल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेय.


मीडियाला प्रवेश नाकारताना सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेय. सरकारी माहिती गोपनीय रहावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंग यांनी २७ डिसेंबरला हा आदेश राज्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना जारी केलाय. त्यामुळे यापुढे पत्रकार सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी कार्यालयात भेटू शकणार नाहीत.


मुख्य सचिव उत्पल कुमार सिंग यांनी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनाही बैठकीमध्ये चर्चा होणारी महत्वाची माहिती गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. मीडियापर्यंत योग्य माहिती पोहोचणे हा देखील या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दररोज संध्याकाळी ४ वाजता सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती मीडियाला दिली जाईल, असे उत्पल कुमार यांनी आदेश देताना म्हटलंय.