मेघालयमध्ये सर्वाधिक जागा, तरी काँग्रेसचं टेन्शनमध्ये
ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.
शिलाँग : ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. त्रिपुरामध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. तर नागालँडमध्ये भाजप बहुमतापासून फक्त २ जागांपासून दूर आहे. पण नागालँडमध्येही भाजपचीच सत्ता येईल हे निश्चित झालं आहे.
निवडणुकीला सामोरं गेलेलं तिसरं राज्य असलेल्या मेघालयमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. ५९ मतदारसंघ असलेल्या मेघालयमध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर एनपीपीला १९, इतरांना ११, यूडीपीला ६ आणि भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी अजूनही त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत. पक्षाच्या योजनेबद्दल मी आत्ता काहीही बोलणार नाही, असं संगमा म्हणाले. २००३ पासून मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि २०१० पासून संगमा मुख्यमंत्री आहेत.
मणीपूर आणि गोव्यामध्ये त्रिशंकू अवस्था असताना भाजपनं छोट्या स्थानिक पक्षांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यामुळे मेघालयमध्येही सत्ता स्थापनेची चाचपणी करण्यासाठी भाजपनं आसामचे मंत्री हिमांता बिस्वा सरमा यांना मेघालयमध्ये पाठवलं आहे. तर गोवा आणि मणीपूरसारखा दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसनं वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि कमलनाथ यांना शिलाँगला पाठवलं आहे.