हर घर तिरंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद वाढत आहे. देशातील लाखो लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाइल फोटोच्या जागी तिरंगा लावला आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पीएम मोदींच्या या आवाहनाचे स्वागत केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर डीपी बदलला खरा. पण त्यांनी नुसता तिरंगा न लावता त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र बसलेला फोटो आणि त्यांच्यासमोर राष्ट्रध्वज आणि आता अवैध असलेला जम्मू - काश्मीरचा ध्वज दिसत आहे.



पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात सांगितले होते की 'आझादी का अमृत महोत्सव' ने जनआंदोलनाचे रूप धारण केले आहे. त्यांनी लोकांना 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीवर तिरंगा लावण्याची विनंती केली होती. पण मेहबुबा मुफ्ती यांनी डीपी बदलत म्हटले की त्यांचा ध्वज जम्मू आणि काश्मीरमधून "हडपला" गेला असेल, परंतु लोकांच्या सामूहिक जाणीवेतून तो पुसला जाऊ शकत नाही.


'आमचा ध्वज पुसून टाकू शकत नाही'


मेहबूबा यांच्या ट्विटर अकाऊंटवरील फोटो नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या रॅलीचा आहे, त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद हे तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री होते. मेहबूबा यांनी ट्विट केले की, “ध्वज हे आनंद आणि अभिमानाचे प्रतीक असल्याने मी माझा डीपी बदलला आहे. आपल्या राज्याचा ध्वज भारतीय ध्वजाशी जोडलेला होता, जो बदलता येत नाही. तुम्ही आमचा ध्वज आमच्याकडून हिसकावून घेतला असेल, पण आमच्या सामूहिक जाणीवेतून तो पुसला जाऊ शकत नाही.'


विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने राज्यघटनेतील कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरमधून विशेष दर्जा काढून घेण्यात आला. त्यानंतर जम्मू-काश्मीरचा ध्वज अवैध ठरला.