काश्मीरमध्ये काहीतरी मोठा प्लॅन; मेहबुबा मुफ्तींनी मध्यरात्री बोलावली बैठक
सरकारने अमरनाथ यात्रा अचानकपणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
श्रीनगर: केंद्र सरकारने काश्मीरमध्ये कोणतीतरी मोठी योजना आखली आहे, असे वक्तव्य जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले. त्या शुक्रवारी बारामुला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपच्या प्रमुख नेत्यांची वक्तव्ये आणि खोऱ्यातील सुरक्षा दलांची मोठ्याप्रमाणावर केलेली जमवाजमव पाहिली तर कोणत्याही काश्मिरी नागरिकाच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. केंद्रीय सुरक्षा दलांकडून राज्यातील पोलीस दलापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत. या सर्व घडामोडी पाहता केंद्राने काश्मीरमध्ये काहीतरी मोठी योजना आखल्याचे सूचित होत असल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले.
काश्मीरमध्ये सैन्याच्या हालचाली वाढल्या असून २८० तुकड्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच केंद्र लष्कर आणि वायूदलालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक पक्षांनी मध्यरात्री तातडीची बैठक बोलावली आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे समजते. यावेळी शाह फैजल यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित राहतील.
तत्पूर्वी सरकारने अमरनाथ यात्रा अचानकपणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच यात्रेकरुंना तातडीने काश्मीर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था ढासळत असल्याच्या बातम्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काश्मीरमध्ये अशाप्रकारच्या हालचाली करत असल्याची टीका केली. या निर्णयाचे गंभीर परिणाम होतील, असे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.