मेहबुबा मुफ्तींची धमकी, `तर भारताशी नातं तोडू...!`
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी सरकारला धमकावलंय
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी सरकारला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलंय, जर काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवलं, तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. अशावेळी आम्ही म्हणजे जम्मू-काश्मीर भारताशी नातं संपवून घेऊ. मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलंय की, ३७० आणि ३५ ए ही राज्याची एक वेगळी ओळख आहे. याला कोणत्याही किंमतीवर आम्ही कायम ठेवू.
पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर, त्या पहिल्यांदा राजौरीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तसेच राज्यातील स्थिती सामान्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाटेवर चालावं लागेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सध्या अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (एएसजी) तुषार मेहता उच्च न्यायालयात जम्मू काश्मीरची बाजू मांडत आहेत. मागील आठवड्यात मेहता यांनी न्यायालयात जो युक्तिवाद केला होता, त्यावर मेहबुबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.
दक्षिणा आशियात शांतीसाठी भारत आणि पाकिस्तानात यांच्यात संवाद एक अनिवार्य बाब ठरल्याचं मेहबूबा म्हणतात. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी असं देखील म्हटलंय की, यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना मैत्रीचा हात द्यावा.
परिच्छेद ३५ एला १९५४ मध्ये राष्ट्रपतीच्या आदेशाने संविधानात सामिल करण्यात आले आहे. यानुसार जम्मू आणि काश्मिरच्या नागरिकांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. या कलमानुसार राज्याबाहेरील व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करू शकत नाही. या कलमानुसार राज्यातील कोणतीही व्यक्ती, त्या महिलेला संपत्तीच्या अधिकारापासून बेदखल करू शकतो, जर तिने राज्याबाहेरील व्यक्तीशी विवाह केला असेल. ही तरतूद त्याच्या मुलांना देखील लागू होते.