परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोकसीचा अजब दावा
चोकसीच्या वकिलांनी न्यायालयात अजब दावा केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय बँकांना फसवून परदेशी पळून गेलेल्या मेहुल चोकसीनं आता अजब दावा केला आहे. अँटीग्वात आपल्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे आपण वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ शकत नाही असं चोकसीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. आपल्यावर उपचार सुरू असल्यामुळे आपण भारतात येऊ शकत नाही अशी याचिका चोकसीने न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने चोकसीला वैद्यकीय अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर चोकसीच्या वकिलांनी हा अजब दावा केला आहे.
याआधी ईडीने चोकसीला भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्सची सोय करण्यात तयार असल्याचं सांगितलं होतं.
पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवणारा आरोपी मेहुल चोकसी सध्या अँटीग्वात आहे. २०१७ मध्ये पीएनबी घोटाळ्याचा खुलासा झाला होता त्यानंतर मेहुल चोकसी आणि नीरव मोदी भारत सोडून फरार झाले होते. मेहुल चोकसीचं म्हणणं आहे की, अँटीगुआमध्ये सध्या तो उपचार घेत आहे. डॉक्टरांनी त्याला न प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
मेहुल चोकसी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेचे जवळपास १३ हजार कोटी बुडवले आहेत.