मोदींच्या `फिटनेस` व्हिडिओचीही सोशल मीडियावर टर...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनाही पंतप्रधानांचा हा व्हिडिओ हास्यास्पद आणि विचित्र वाटतोय
मुंबई : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराट कोहलीनं दिलेलं चॅलेंज पूर्ण करत एक व्हिडिओ शेअर केला... या व्हिडिओत ते व्यायाम करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी पंतप्रधान मोदींचं हे फिटनेस चॅलेंज उचलून धरलंय तर काही जणांनी मात्र, मोदींच्या या व्हिडिओची टर उडवणारे फोटो आणि ट्विटस् सोशल मीडियावर शेअर केलेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनाही पंतप्रधानांचा हा व्हिडिओ हास्यास्पद आणि विचित्र वाटतोय. एका फाईव्ह स्टर हॉटेलमध्ये आयोजित इफ्तार पार्टीदरम्यान राहुलनं माकपा महासचिव सीताराम येचुरी यांना संबोधित करताना 'तुम्ही पंतप्रधानांचा फिटनेस व्हिडिओ पाहिलात का? हे हास्यास्पद आहे, म्हणजे मला तर हे विचित्रच वाटतंय' अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
#FitnessChallenge या सोशल मीडियावर ट्रेन्डिंगवर असलेल्या खेळात मोदींनीही आपला सहभाग नोंदवला. क्रिकेटर विराट कोहलीनं दिलेलं चॅलेंज पूर्ण करत त्यांनी आपला व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशा पंचतत्वांनी प्रेरित अशा ट्रॅकवहरर आपण नियमितपणे चालतो, असंही हा व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधानांनी म्हटलं तसंच श्वसनाचे व्यायामही आपण करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.