नवी दिल्ली : प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि इंटरनेट आल्यानंतर अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एका क्लीकवर वस्तू मिळतात तसेच नको असलेल्या विकताही येतात. काही गोष्टी खटकल्या तर निदर्शनासही आणून देता येतात. एखाद्या कंपनी विषयी असमाधानी असलेले काहीजण तक्रार करण्यासाठी ट्वीटरची मदत घेतात. संबंधित आस्थापनेला मेन्शन करत आपले गाऱ्हाणे मांडतात. रेल्वे प्रवाशांना अशा ऑनलाईन तक्रारी करुन प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या आहेत. अनेकांच्या तक्रारींचे निवारणही झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांच्याकडेही ट्वीटरद्वारे अनेकजण कैफियत सांगतात. यामाध्यमातूनही अनेक प्रश्न सुटल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत.यावेळेचे प्रकरण थोडेफार असेच आहे. एका युझरने थेट गुगलला मेन्शन करत त्यांची तक्रार केली आहे. गुगलने याची दखल घेत त्याला उत्तरही दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल मॅपचा वापर जगभरात केला जातो. यामाध्यमातून आपण जगभरातील जागांची माहिती घेऊ शकतो. एखादे मंदिर, सरकारी कार्यालय, सिनेमागृह हे सर्व गुगल मॅपवर सहज सापडते. गुगल मॅप आपल्याला तिथे जाण्याचा शॉर्टकटही सांगतो. पण अनेकांना हे हाताळताना त्रास जाणवतो. त्यामुळे ते गुगल मॅपला नाव ठेवत असतात. दिल्लीचा स्टॅंड अप कॉमेडियन कार्तिक अरोराने मॅपला कंटाळून गुगलला ट्विटरवर मेन्शन करत तक्रार केली. यानंतर गुगलने देखील कार्तिकला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. 


कार्तिक अरोराला फ्लायओव्हरवरून प्रवास करताना गुगल मॅपने चकवा दिला होता. त्यामुळे 2 कि.मी दूर जाऊन नंतर यू टर्न घ्यावा लागला होता. याप्रकरणावर त्याने ट्वीट केले. डियर गुगल, इतका चांगला मॅप आहे.  त्यात एक छोटासे फिचर अजून टाकायचं ज्यामध्ये फ्लायओव्हर चढायचा की नाही ? हे स्पष्ट कळेल. पाच इंचाच्या स्क्रिनवर अर्ध्या किलोमीटरचे स्पष्ट चित्र माणूस कसा बघणार ? तुमचा, 2 किलोमीटरहून यू टर्न घेणारा माणूस. 



कार्तिकचे ट्वीट पाहून गूगलने शायरीच्या अंदाजात तात्काळ रिट्वीट केले. आभार तुमच्या सारख्या युजर्सचे जे आम्हाला योग्य रस्ता दाखवतात. सुधारण्याचा हा प्रवास कायम राहील माझ्या सहप्रवाशा. गुगलचे हे ट्वीट खूपच व्हायरल झाले आहे. सोशल मीडियामधील तरुणांना गुगलचा शायरीचा अंदाज खूप भावल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.