`बुखारीचे काय झाले हे लक्षात आहे ना?, भाजप माजी मंत्र्यांची पत्रकारांना धमकी
बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना धमकी दिलेय.
श्रीनगर : काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना धमकी दिलेय. त्यामुळे त्यांनी नवा वाद ओढवून घेतलाय. जम्मू-काश्मीर राज्यातील पत्रकारांनी स्वत:साठी एक मर्यादारेषा आखून घ्यावी. शुजात बुखारी यांचं काय झालं हे सर्वांच्या लक्षात आहेत ना?, असं म्हणत सिंह यांनी पत्रकारांना इशारा वजा धमकी दिलेय. बुखारी यांची गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती.
जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी राहिलेले भाजप नेते चौधरी लाल सिंह यांनी धमकी दिल्याने भाजपला त्यांनी अडचणीत आणलेय. आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना शुजात बुखांरीसारखे न वागण्याचा इशारा दिला आहे. त्याआधी त्यांनी कठुआ प्रकरणी वादग्रस्त विधान केले होते. पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. पत्रकारांनी शुजात बुखारी यांच्यासोबत काय झाले हे ओळखून काम करायला हवे. काश्मीरमधल्या पत्रकारांनी एक प्रकारे चुकीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे काश्मीरच्या पत्रकारांनी मर्यादेत राहायला हवे, बंधुभाव सांभाळयला हवा. राज्याची प्रगती होईल,' असंही सिंह म्हणाले.
श्रीनगरमध्ये १४ जून रोजी पत्रकार वसाहतीजवळ शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बुखारी स्थानिक वृत्तपत्र रायझिंग काश्मीरचे संपादक होते. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. याआधी याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब या जवानाचं अपहरण करण्यात आलं. या जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांमुळे काश्मीरमधील परिस्थिती बिघडली असताना १९ जून रोजी भाजपने जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.