मुंबई : येत्या सोमवारी बुध ग्रह हा सूर्यबिंबावरून अधिक्रमण करणार आहे. मात्र, हे अधिक्रमण भारतामध्ये दिसणार नसून केवळ उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड या देशांमध्येच दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. तसेच अशा प्रकारचे अधिक्रमणचा योग तेरा वर्षांनंतर पुन्हा येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ नोव्हेंबर रोजी होणारे बुध ग्रहाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही.तर ते मिडल इस्ट,यूरोप,आफ्रिका,दक्षिण ग्रीनलॅंड,अंटार्क्टिका,दक्षिण अमेरिका , अलास्का सोडून उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलॅण्ड येथून दिसणार असल्याने तेथील खगोलप्रेमींसाठी ही अधिक्रमण निरीक्षणाची पर्वणी असणार आहे असे  खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की पृथ्वीवरून पाहतांना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो. त्यालाच ‘ बुध ग्रहाचे अधिक्रमण ‘ असे म्हणतात.


बुध ग्रहाप्रमाणेच शुक्र ग्रहाचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते. बुध ग्रहाचे अधिक्रमण मात्र दुर्बिणीतून पहावे लागते. सूर्यग्रहणात जसे चंद्रबिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसते तसाच हा प्रकार असतो.



यापूर्वी ९ मे २०१६ रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण झाले होते. आता यानंतर पुन्हा तेरा वर्षानी दि. १३ नोव्हेंबर २०३२ रोजी असा योग येणार आहे. शुक्र ग्रहाचे अधिक्रमण ६ जून २०१२ रोजी झाले होते. यापुढे ते ११ डिसेंबर २११७ रोजी दिसणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या खगोल घटना दुर्मिळ घडत असल्याने खगोलप्रेमी निरीक्षकांसाठी ती एक पर्वणी असते.