`भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था गंभीर; लहानसहान उपायांनी काहीही होणार नाही`
भारतीय अर्थव्यवस्थेने आठ ते नऊ टक्याच्या दराने विकास करणे अपेक्षित आहे.
नवी दिल्ली: अर्थव्यवस्था हे समाजाचे प्रतिबिंब असते. भारतात सध्या या दोन्ही घटकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने ४.५ टक्क्यांची निच्चांकी पातळी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केले. यावेळी मनमोहन सिंग यांनी म्हटले की, सध्या देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक अवस्थेत आहे. मात्र, भारतीय समाजाची परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर आहे. विकासदरासंदर्भात समोर आलेली आकडेवारी कदापी समर्थनीय नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेने आठ ते नऊ टक्याच्या दराने विकास करणे अपेक्षित आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत हा आकडा ५ टक्के इतका होता. दुसऱ्या तिमाहीत विकासदर थेट ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हे खूपच चिंताजनक आहे. त्यामुळे आता केवळ लहानसहान उपाय करून अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारणार नाही, असा इशारा मनमोहन सिंग यांनी दिला.
त्यासाठी सध्या समाजात असलेली भीती जाऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्याची गरज आहे. जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर पुन्हा आठ टक्क्यांच्या गतीने धावू लागेल. अर्थव्यवस्था हे समाजाचे प्रतिबिंब असते. मात्र, सध्या आपल्या सामाजिक विश्वासाची वीण उसवली गेली आहे, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.
राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेविषयीच्या चिंतेत भर पडली आहे. या आकडेवारीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले. भारतीय अर्थव्यवस्थेची ही गेल्या सहा वर्षांतील निच्चांकी कामगिरी आहे. यापूर्वी मार्च २०१३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.३ टक्के इतका नोंदवण्यात आला होता.