मुंबई : सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. शांतता आणि सकारात्मकतेचं प्रतिक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस हा सण आज मोठ्या उत्साहात जगभरात साजरा होत आहे. विविध ठिकाणी चर्चमध्ये २४ तारखेच्या मध्यरात्री प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यावेळी अनेक ख्रिस्त धर्मियांनी सुरेख अशी वेशभूषा करत या प्रार्थनेला हजेरी लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली येथील सेक्रेड हार्ट कॅथेड्रल चर्च, मुंबईच्या माहिम येथील सेंट मायकल चर्च, कर्नाटकातील फ्रान्सिस झेविअर्स कॅथेड्रल चर्च अशा विविध ठिकाणी मासचं आयोजन करण्यात आलं होतं. ख्रिसमसच्या दिवसांमध्ये प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या गोव्यातील अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कंन्सेप्शन चर्च येथेही ख्रिसमसच्या निमित्ताने बरीच गर्दी पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला गोव्यात लया आनंदपर्वाच्या निमित्ताने पर्यटकांचीही तोबा गर्दी झाली आहे. 







संपूर्ण जगात ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच गुगलही यात मागे राहिलेलं नाही. नेहमीप्रमाणेच या खास दिवसाचं औचित्य साधत गुगलने एक अॅनिमेडेट डूडल साकारलं आहे. या डूडलमध्ये मोठ्या कलात्मकपणे सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, भेटवस्तू मिळालेली एक व्यक्ती अशी चित्र पाहायला मिळत आहेत.



डुडलवर क्लिक केलं असता, हॅप्पी हॉलिडे हे अॅन्डी विलियम्स यांचं गाणं वाजतं. ख्रिसमस, जिंगल बेल्स आणि अतिशय आनंददायी, उत्साही असा आवाज या गाण्याला खऱ्या अर्थाने खास करतं आणि नकळतच ते ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलून जातं.