`ऑगस्टा वेस्टलँड` भ्रष्टाचार : २९५ कोटींची लाच घेणाऱ्याला अटक
भारतीय नोकरशहांनी केला सरकारी पदाचा दुरुपयोग
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर भ्रष्टाचार प्रकरणी भारतीय तपास यंत्रणांना मोठं यश मिळालंय. छत्तीसशे कोटींच्या या व्यवहारात मध्यस्थ असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेल याचं दुबईमधून भारतात प्रत्यार्पण झालंय. मंगळवारी रात्री मिशेलला भारतात आणलं, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संयुक्त अरब अमिरातींच्या दौऱ्यावर होत्या. यूएईचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन झायेद यांच्यासोबत स्वराज यांची बैठक झाल्यानंतर सूत्रं वेगानं फिरली. सीआयडी आणि इंटरपोलनं मिशेलला दुबई विमानतळावर आणलं आणि त्यानंतर त्याला भारतात आणलं. २०१० साली झालेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये मिशेलला २९५ कोटी रुपयांची लाच दिली गेल्याचा आरोप आहे. मिशेलच्या प्रत्यार्पणाला दुबईमधल्या न्यायालयांनी हिरवा कंदील दिला होता.
यूपीए सरकारच्या कार्यकाळात २६०० करोड रुपयांच्या १२ ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारात ५७ वर्षीय ख्रिश्चियन मिशेल यानं दलालाची भूमिका निभावली होती. मिशेलला दुबईहून भारताकडे प्रत्यार्पित करण्यात आलंय. ब्रिटिश - इटालियन कंपनी ऑगस्टा वेस्टलँडनं हा सौदा मिळवण्यासाठी मिशेलला दलालीसाठी ४२ मिलियन युरो (२९५ करोड रुपये) दिले होते.
सहआरोपींमध्ये तत्कालीन वायुसेना प्रमुख एस पी त्यागी आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही समावेश आहे. या षडयंत्रात नोकरशहांनी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचं उ़ड्डाण भरण्याची उंची ६००० मीटरहून कमी करत ४५०० मीटरपर्यंत आणली... सरकारी पदाचा दुरुपयोग करण्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
भारत सरकारनं ८ फेब्रुवारी २०१० रोजी संरक्षण मंत्रालयाद्वारे ब्रिटनला ऑगस्टा वेस्टलँड इंटरनॅशनल लिमिटेडला जवळपास ५५.६२ करोड युरोचं (३६०० करोड रुपये) कंत्राट दिलं होतं.