मध्यप्रदेशात IAFच्या `मिग २१`ला अपघात, दोन्ही पायलट सुरक्षित
रशियन बनावटीचं `मिग २१` हे सुपरसॉनिक लढावू विमान आहे
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये भारतीय वायुदलाच्या 'मिग २१' या विमानाला अपघात झाल्याची माहिती हाती येतेय. प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या या विमानात दोन पायलट स्वार होते. विमानाला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत ग्रुप कॅप्टन आणि स्क्वाड्रन लिडर या दोन्ही वैमानिक विमानातून वेळीच बाहेर पडत आपले प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले. वायुदलाचे अधिकारी लवकरच घटनास्थळी दाखल होत आहेत.
रशियन बनावटीचं 'मिग २१' हे सुपरसॉनिक लढावू विमान आहे. 'मिग २१' हे लढावू विमान 'सिंगल पायलट' (एकाच पायलटला बसण्यासाठी जागा) आहे. परंतु, प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या विमानात (ट्रेनर एअरक्राफ्ट) दोन पायलट बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भारतीय वायुदलात १०० हून अधिक मिग-२१ विमानांचा ताफा आहे. या लढावू विमानात दारुगोळा वाहून नेण्याची आणि गोळीबाराची क्षमता आहे. एअर टू एअर (हवेतून हवेत) आणि एअर टू सरफेस (हवेतून जमिनीवर) हल्ला करण्यासाठी हे विमान सक्षम आहे.
याआधी, ८ मार्च २०१९ रोजी भारतीय वायुसेनेच्या एका 'मिग २१' या विमानाला राजस्थानच्या बिकानेरमध्ये अपघात झाला होता. विमानाला पक्षाची धडक बसल्यामुळे ही दुर्घटना घडली होती.