नवी दिल्ली : अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचा व्हिडिओ लष्कराकडून जारी केला आहे. किमान चार ते पाच अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर दक्षिण भारतात अतिरेकी हल्ल्याचा धोका, असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अॅलर्टवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झाले आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने मसूद अजहरला पकडून कारागृहात टाकल्याचे सांगितले जात होते. त्याची प्रकृती देखील ठिक नसल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता पुलवामा हल्ल्यानंतर कधीही मसूद अजहरला कारागृहात टाकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मसूद अजहर बहवालपूरच्या मरकज सुभान अल्लाहमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे.


दरम्यान, सोपोर पोलिसांनी सोमवारी लष्कर-ए-तोयबाच्या आठ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांकडून स्थानिकांना धमकावणे आणि चिथावणीखोर पत्रके छापण्याचे काम सुरु होते. तसेच सोपोर परिसरात झालेल्या स्थानिकांच्या हत्येमध्येही या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी सुरक्षा दलांनी संगणक आणि इतर सामुग्री जप्त केले आहे.


या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यातही यश आले आहे. ऐजाझ मीर, ओमर मीर, तवसीफ नजर, इम्तियाज नजर, ओमर अकबर, फैजान लतीफ, दानिश हबीब आणि शौकत अहमद मीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.