मुंबई : भारताचे 'फ्लाइंग शीख' म्हणजेच महान धावपट्टू  मिल्खा सिंग यांचे काल रात्री निधन झाले. गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला. मात्र तरीही वयाच्या 91 व्या वर्षी मिल्खा सिंग यांचे निधन झाले.  काल त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यानंतर त्यांनी उपचारा दरम्यान आपले प्राण सोडले. मिल्खा सिंग हे भारताच्या क्रीडा इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पासून ते तत्कालीन पाकिस्तानचे अध्यक्ष फील्ड मार्शल अय्यूब खानपर्यंत प्रत्येक जण मिल्खा यांच्या कौशल्यांचे चाहाते होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी गोविंदपुरा (सध्या पाकिस्तानचा भाग) येथे एका शीख कुटुंबात झाला होता. त्याचे बालपण खूप कठीण काळातून गेले. भारताच्या फाळणीनंतर भारत पाकिस्तानामध्ये झालेल दंगलीत मिल्खा सिंग यांनी त्यांचे आईवडील आणि भावंड गमावली. त्यांना लहानपणापासूनच धावण्याची आवड होती. त्यामुळेच ते त्यांच्या घरापासून शाळा आणि शाळेपासून घरापर्यंत 10 किलोमीटर धावत प्रवास करायचे.


मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग शीख' ही ओळख मिळण्याची कहाणी अत्यंत रंजक आहे आणि ही कहानी पाकिस्तानशी संबंधित आहे. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्याबद्दल मिल्खा सिंग यांना अतिशय दु:ख झाले. त्याच वर्षी त्यांना पाकिस्तानमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट स्पर्धेत भाग घेण्याचे आमंत्रण मिळाले. मिल्खा सिंग यांना फाळणी दरम्यान घडलेल्या घटनेमुळे आणि त्यांच्या कुटूंबाच्या आठवणींमुळे पाकिस्तानला जायचे नव्हते.


परंतु नंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सांगण्यावरुन त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.


अब्दुल खालिक यांचे नाव त्यावेळी पाकिस्तानमधील अ‍ॅथलेटिक्समध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांना तेथे सर्वात वेगवान धावपटू मानले जात होते आणि मिल्खा सिंग यांना अब्दुल खालिक यांच्या विरुद्ध स्पर्धा खेळायची होती. परंतु अब्दुल खलील मिल्खा यांच्या वेगासमोर टिकू शकले नाहीत आणि मिल्खा सिंग यांनी त्या स्पर्धेत विजय मिळवलाच.


या शर्यतीनंतर पाकिस्तानचे तत्कालीन फील्ड अध्यक्ष मार्शल अय्यूब खान यांनी मिल्खा सिंग यांचे नाव 'फ्लाइंग शीख' असे ठेवले आणि म्हणाले की 'आज तुम्ही पळाला नाहीत तर तुम्ही उडाला आहेत. म्हणूनच मी तुम्हाला फ्लाइंग शीख ही पदवी देत आहे.


या घटने नंतर, मिल्खा सिंग याच नावाने जगभर प्रसिद्ध झाले. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्रीनेही सन्मानित केले आहे. पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च सन्मान आहे.


1951 मध्ये सैन्यात दाखल


चार प्रयत्नांनंतर 1951 मध्ये मिल्खा सिंग सैन्यात दाखल झाले. भरती दरम्यान घेण्यात आलेल्या क्रॉस-कंट्री रेसमध्ये ते सहावे आले, म्हणून सैन्याने त्यांना खेळाच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवडले. तेथून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.


मिल्खा यांना अ‍ॅथलीट होण्याचा इतका वेड होता की, ते सराव करण्यासाठी धावत्या ट्रेन सोबत पळत असायचे. या सरावा दरम्यान, बऱ्याच वेळा त्यांचे रक्तही वाहू लागले आणि बऱ्याचदा त्यांना श्वासही घेता यायचा नाही, परंतु तरीही ते रात्रंदिवस सतत सराव करत असायचे.


मेलबर्न येथे झालेल्या 1956 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी प्रथमच 200 मीटर आणि 400 मीटर शर्यतींमध्ये भाग घेतला. खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना पहिला अनुभव चांगला आला नसाला, तरी हा दौरा त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरला. त्यावेळी विश्वविजेते अ‍ॅथलिट चार्ल्स जेनकिन्सबरोबर झालेली भेट भविष्यात त्यांच्यासाठी एक महान प्रेरणा ठरली.