संसदेत शपथ घेतल्यानंतर ओवैसी म्हणाले, ‘जय फिलिस्तीन!’ एकच गदारोळ…
18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शपथ घेतल्यानंतर `जय फिलिस्तीन`ची (Jai Palestine) घोषणा दिली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी घेतलेली शपथ वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याचं कारण त्यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय फिलिस्तीन'ची घोषणा दिली. शपथ पूर्ण होताच त्यांनी आधी जय भीम म्हटलं. यानंतर जय मीम, जय तेलंगाणा आणि जय फिलिस्तीन (Jai Palestine) म्हटलं. यावेळी त्यांनी भारतातील उपेक्षित लोकांचे प्रश्न मी प्रामाणिकपणे मांडत राहीन असंही सांगितलं.
असदुद्दीन ओवेसी यांनी 'जय फिलिस्तीन' घोषणा दिल्यानंतर वाद सुरु झाला असून, राजकारण तापलं आहे. दरम्यान ओवेसी यांनी त्यांच्या घोषणेवरुन टीका आणि विरोध आहे असं विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. एमआयएम प्रमुखांनी यावर उत्तर देताना सांगितलं की, "कोण काय म्हणालं हे सर्व तुमच्यासमोर आहे. मी फक्त जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि जय फिलिस्तीन असं म्हटलं. याशिवाय इतरांनी काय म्हटलं तेही ऐका".
भाजपा नेते जी किशन रेड्डी यांनी ओवेसींच्या या घोषणेचा विरोध केला आहे. तसंच हे रेकॉर्डवरुन हटवलं जावं अशी मागणीही केली आहे. यावर ओवेसींनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, "ते विरोध करत असतात, हेच त्यांचं काम आहे. आम्हाला जे म्हणायचं होतं ते आम्ही म्हटलं आहे. आम्ही त्यांना खूश करण्यासाठी कशाला काही बोलू?".
भाजपा नेते जी किशन रेड्डी म्हणाले आहेत की, या देशाच्या संसदेत शपथ घेताना जय फिलिस्तीनची घोषणा देणं पूर्णपणे चुकीचा आहे. ते म्हणाले की, एकीकडे ओवेसी संविधानाबद्दल बोलतात आणि दुसरीकडे संविधानाच्या विरोधात घोषणा देतात. तसंच भारतात राहून पॅलेस्टाईनचे गुणगाण गाणं पूर्णपणे चुकीचे आहे. अशा घटनांमुळे या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. हे लोक रोज प्रत्येक विषयावर असे प्रकार करतात. लोकसभेत अशा घोषणा देणाऱ्यांची ओळख पटवावी, अशी मी जनतेला विनंती करतो, असं ते म्हणाले.