Menstruation Paid Leave Policy: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी महिलांच्या मासिक पाळीसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन मासिक पाळीची सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे.


राज्यसभेमध्ये विचारण्यात आला प्रश्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मासिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणी उत्तर देत होत्या. त्यावेळेसच त्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीबद्दल भाष्य केलं. "मासिक पाळी, मासिक पाळीचे चक्र हे काही अपंगत्व नाही. महिलेच्या आयुष्याचा एक भाग आहे. मासिक पाळी न येणार्‍या व्यक्तीचा मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असल्यामुळे महिलांना समान संधी नाकारल्या जातात अशा अर्थाने आपण समस्यांचा बाऊ करु नये," असं स्मृती इराणी म्हणाल्या.


सरकार धोरण आखणार?


मागील आठवड्यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणींनी, "कार्यालयांमध्ये काम करणाऱ्य माहिलांना मासिक पाळीसाठी भरपगारी सक्तीची सुट्टी देण्याचं धोरण आखण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही," असं म्हटलं आहे. वरिष्ठ सभागृहामध्ये बुधवारी स्मृती इराणींनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये, "मासिक पाळीमुळे डिसमेनोरिया किंवा तत्सम तक्रारींनी ग्रस्त असलेल्या महिला/मुलींची संख्या फार कमी आहे. तसेच यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये औषधोपचाराने इलाज शक्य आहे," असं म्हटलं होतं.


महिलांना लाजीरवाणी वागणूक


"मात्र मासिक पाळीचा मुद्दा आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींबद्दल अनेकदा बोललं जात नाही. अनेकदा महिलांना लाजिरवाणी वागणूक दिली जाते. मासिक पाळी असलेल्या व्यक्तींवर बंधन लादली जातात. त्यांची गतिशीलता, स्वातंत्र्य आणि सामान्य दिनचर्येदरम्यान काही ठिकाणी प्रवेश नाकारला जातो. सामाजिक नियमांचा दाखला देत बर्‍याच वेळा महिलांचा छळ होतो किंवा त्यांना एकप्रकारे सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. जेव्हा एखादी मुलगी मासिक पाळीला प्रथमच सामोरे जात असते तेव्हा तिला भावनिक आणि शारीरिक बदलांबद्दल माहिती नसते. अशावेळेस ती अधिक संवेदनशील होते,” असंही स्मृती इराणी यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.


यापूर्वी केलेलं समर्थन


विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये, सरकारने मासिक पाळीच्या स्वच्छता धोरणाचा मसुदा जारी केला ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी मासिक पाळीच्या काळात सुट्टीच्या तरतुदींचे समर्थन केले होते. “शैक्षणिक संस्था आणि कार्यालये सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी, कर्मचार्‍यांच्या विविध गरजा ओळखण्यासाठी आणि सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि उत्पादकतेला समर्थन देणारे वातावरण तयार करणं गरजेचं आहे. मासिक पाळीच्या दरम्यान व्यक्तींच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी लवचिक कामकाजाच्या व्यवस्थेसारख्या तरतुद असावी. यामध्ये घरातून काम किंवा सपोर्ट रजा दिली जावी,” असे मसुद्यात नमूद केले होते.