नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी विक्रमी आकडा ओलांडत आहे. ज्यामुळं चिंतेच्या परिस्थितीत वाढ होत असल्याचीच प्रतिक्रिया अनेकजण करत आहेत. एकिकडे रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असतानाच दुसरीकडे देशात कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. ज्यासंदर्भात माहिती देत देशातील कोरोनाबाधितांचे ७० टक्के मृत्यू पाच राज्यांमध्येच झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू अशा राज्यांमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे कोरोनाबाधितांची संख्या सरासरी २७९२ इतकी आहे. परिणामी जागतिक आकडेवारीशी याची तुलना केली असता हे प्रमाण सर्वात कमी असल्याची बाब समोर येत आहे. 


कोरोनाशी लढा देत असतानाच सुरुवातीपासूनच देशातील आरोग्य मंत्रालयानं काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्व जारी केली होती. ज्यामध्ये काही निर्बंधांचं पालन करण्यासोबतच, हात स्वच्छ आणि ठाराविक वेळानं धुण्याचा सल्ला देण्यात आला. शिवाय फिजिकल डिस्टन्स अर्थात सुरक्षित शारीरिक अंतर पाळण्यासोबतच मास्कचा वापरही अनिवार्य असण्याचं सांगण्यात आलं.


 


मास्कच्या वापरासंबंधीच आता आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. जर, तुम्ही स्वत:चं खासगी वाहन चालवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला मास्कची आवश्यकता नाही. पण, जर कारमध्ये तुमच्यासोबत इतरही व्यक्ती असतील तर तुम्ही मास्क वापरु शकता. समुहानं कोणतंही काम करतेवेळी मास्कचा वापर केलाच पाहिजे असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. त्यामुळं यापुढे कारमधून प्रवास करतेवेळी मास्क वापरण्यापूर्वी या गोष्टी नक्की ध्यानात घ्या. 


सतर्क राहा, कोरोनाला दूर ठेवा!