कानपूर : उत्तरप्रदेश अल्पसंख्यांक आयोगानं मंगळवारी निदा खान हिच्याविरुद्ध फतवा जारी करणाऱ्यांना जोरदार दणका दिलाय. फतवा जारी करणाऱ्यांना अटक झाली नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश आयोगानं बरेलीच्या जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना  दिलेत. आयोगाचे अध्यक्ष तन्वीर हैदर उस्मानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना अटक झाली नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी असे आदेश डीएम आणि एसएसपी यांना देण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आला हजरत कुटुंबाची माजी सून निदा खान हिच्याविरोधात १६ जुलै रोजी फतवा जारी करण्यात आला होता. निदानं हलाला, तीन तलाक आणि बहुविवाह यांच्याविरोधात आवाज उठवला होता.


शहराचे इमाम मुफ्ती खुर्शीद आलम यांनी दर्गा आला हजरत परिसरात पत्रकार परिषद घेऊन दर्ग्याच्या दारुल इफ्ता विभागानं निदाविरुद्ध फतवा जारी केल्याचं म्हटलं होतं. 


निदाविरोधात क्रूर फतवा 


निदा अल्लाहच्या कामात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे तिचं हुक्का-पानी बंद करम्यात आलंय. तसंच निदा हिची मदत करणाऱ्या आणि तिची भेट घेणाऱ्या मुस्लिमांनाही इस्लाममधून बाहेर काढण्यात येईल... तसंच निदा आजारी पडली तरी तिला कुणीही औषधं देऊ नयेत... निदा हिच्या मृत्यूनंतर 'जनाजा'च्या नमाज पढण्यावरही बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर तिच्या मृत्यूनंतर तिला कब्रस्तानातही जागा मिळू नये यासाठी तिचा कब्रस्तानात दफनविधी करण्यावरही बंदी घालण्यात आलीय, असं मुफ्ती आलम यांनी म्हटलं होतं. 


यानंतर निदानं एक पत्रकार परिषद घेत या फतव्यावर पलटवार केला. फतवा जारी करणाऱ्यांना पाकिस्तानात निघून जावं. हिंदुस्तान एक लोकशाही असलेला देश आहे. इथं दोन कायदे चालणार नाहीत. एखाद्या मुस्लिमाला इस्लाममधून बाहेर काढण्याची परवानगी कुणालाही नाही. केवळ अल्लाह गुन्हेगार आणि निष्पाप असल्याचा निर्णय करू शकतो. 


निदा आला हजरत कुटुंबाची माजी सून


निदा हिचा निकाह आला हजरत कुटुंबातल्या उस्मान रजा खां उर्फ अंजुम मियां यांचा मुलगा शीरान रजा खां याच्यासोबत १६ जुलै २०१५ रोजी झाला होता. परंतु, फेब्रवारी २०१६ मध्ये त्यांचा तलाक झाला. त्यानंतर निदानं न्यायालयीन लढाई सुरू केलीय. निदा इतर तीन तलाकच्या बळी ठरलेल्या महिलांसाठीही आंदोलन करतेय. यानंतर २० जुलै रोजी निदाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.