सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा अलर्ट, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी `मिशन 100 डे` अभियान
सणासुदीनंतर कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू शकतात अशी भीती वर्तवण्यात आली आहे
मुंबई : देशात सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात कोविड -19 संसर्ग नियंत्रित करण्यासाठी 'मिशन 100 डे' नावाची मोहीम सुरू केली आहे. सणासुदीनंतर कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू शकतात अशी भीती वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना कोरोना नियमावलीचं पालन करून सण साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
देशात रविवारी 2 लाख 30 हजार 971 सक्रिय रुग्णसंख्या होती. नऊ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 34 जिल्ह्यांमध्ये अजूनही 10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. WHO ने दिलेल्या निर्देशांनुसार पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली असल्यास कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचं मानलं जातं.
त्यामुळे केंद्र सरकारतर्फे राज्यांना लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यास सांगण्यात आलं आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असते. ही आकडेवारी वाढू नये यासाठी लोकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. यासाठी पुढचे 100 दिवस अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी न करता सण साजरे करावेत असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनावर मात करता येणं शक्य होणार आहे.
सध्या देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असून ही एक दिलासादायक गोष्ट आहे. पण त्यामुळे लोकं निर्धास्त झाली आहेत. कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाचा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येकालाच काळजी घेणं आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.