मिझोराम : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मिझोरामने 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मिझोराममध्ये गुरुवारी सरकारने राजकीय पक्ष, एनजीओसोबत एकत्रित बैठक केली होती. या बैठकीत सर्वांच्या एकमताने लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिझोराममध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेला एकही रुग्ण नाही. एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसूनही राज्याने 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्याने या नव्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याबाबतही निर्णय घेतला आहे.


संपूर्ण देशात 17 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3.0 संपणार आहे. अनेक राज्य लॉकडाऊन आणखी वाढवण्यासाठी आग्रही आहेत. तर अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे लॉकडाऊन पुढे वाढवण्याची शिफारस केली आहे. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश या राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेल्या संवादात लॉकडाऊन 4.0 बाबतचे संकेतही दिले आहेत.


आसामने केंद्र सरकारकडे 17 मे रोजी समाप्त होणारा लॉकडाऊन आणखी कमीत कमी दोन आठवड्यापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांनी, आम्ही लेखी शिफारस पाठविली असून सध्या लॉकडाऊन सुरु राहावे अशी इच्छा व्यक्त केली असल्याचं सांगण्यात आलं आहे.