अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा शिवसेनेला पाठिंबा
शिवसेनेचं संख्याबळ वाढलं.
मुंबई : कोल्हापुरातल्या शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता शिवसेनेचं संख्याबळ आता ६४ वर गेलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास असल्यानंच शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार तसंच शिरोळ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आणि ओला दुष्काळमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार
१. साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला होता. मंजुळा गावित या शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या सहाव्या आमदार आहेत.
२. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
३. प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू यांनी अमरावतीमधील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
४. मेळघाट मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार रामकुमार पटेल यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
५. भंडारा विधानसभा मतदारसंघातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.
६. रामटेकचे अपक्ष उमेदवार आशिष जैसवाल यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
७. मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येचा पराभव करणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.