Manipur Violence: जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळलं; वयस्कर असल्याने कुटुंबाने सोडलं होतं मागे
Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने संतापाची लाट उसळलेली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 28 मे रोजी जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळून ठार केलं. हल्लेखोर वयस्कर महिलेला काही करणार नाहीत असा विचार करत कुटुंबाने त्यांना मागे ठेवलं होतं.
Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने उसळलेली संतापाची लाट अद्यापही शमलेली नसताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये 28 मे रोजी एका 80 वर्षीय महिलेची राहत्या घरात जाळून हत्या करण्यात आली. महिला एका स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी होती. महिला घरात असताना हल्लोखारांनी दरवाजा बाहेरुन लॉक केला आणि आग लावली. सेरोऊ पोलीस स्टेशनमध्ये (Serou Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पती एस चूरचंद सिह (S Churachand Singh) हे स्वातंत्र्यसैनिक होते. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम (Abdul Kalam) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
सोरोकायबाम इबेटोंबी (Sorokhaibam Ibetombi) यांना 28 मे रोजी जिवंत जाळण्यात आलं. जमावाने परिसरात हल्ला केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांना मागे घरीच सोडलं होतं. जमाव वयस्कर महिलेला काही त्रास देणार नाही असं कुटुंबीयांना वाटलं होतं. पण त्यांचा हा समज खोटा ठरला आणि जमावाने जिवंत जाळून त्यांना ठार केलं.
इंफाळपासून 80 किमी अंतरावर असणाऱ्या सेरो येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. महिलेच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 28 मेच्या रात्री काही शस्त्रधारी व्यक्ती त्यांच्या परिसरात घुसल्या होत्या. यानंतर त्यांनी घरांना आग लावण्यास सुरुवात केली होती. यानंतर कुटुंबाने तेथील स्थानिक आमदाराच्या घरात आश्रय घेतला होता. नंतर त्यांना इंफाळमध्ये नेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
दोन महिन्यांनी कुटुंब जेव्हा आपल्या गावी परतलं तेव्हा त्यांचं घर आगीत जळून भस्मसात झालं होतं. घराच्या राखेत त्यांना एक फोटो सापडला जो सोरोकायबाम इबेटोंबी यांना फार प्रिय होता. या फोटोत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि तिचे पती एकत्र आहेत.
सोरोकायबाम इबेटोंबी यांचे पती सोरोखाईबाम चुराचंद मीतेई यांचा जन्म 28 मे 1918 रोजी झाला होता. त्यांनी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. यासाठी ते 1931 ते 1932 पर्यत जेलमध्ये होते. स्वातंत्र्यानंतरचे ते सेरो गावाचे पहिले प्रधान होते.
बर्याच वर्षांपासून सेरो गाव काही कुकी कुटुंबांव्यतिरिक्त मैतई, बंगाली, नेपाळी लोकसंख्येसाठी ओळखले जात होते.