मोदी सरकार-२ मध्ये महिलांची संख्या घटली; महिला मंत्र्यांकडे सोपवल्या `या` जबाबदाऱ्या
निर्मला सीतारमण, हरसीमरत कौर बादल, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंह सरुता आणि देबाश्री चौधरी या महिला मंत्र्यांचा मोदी सरकार-२ मध्ये समावेश झालाय
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं निवडणून आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्र्यांनी गुरुवारी पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सहा महिला मंत्र्यांनी शपथ घेतली. आज या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलंय. निर्मला सीतारमण, हरसीमरत कौर बादल, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंह सरुता आणि देबाश्री चौधरी या महिला मंत्र्यांचा मोदी सरकार-२ मध्ये समावेश झालाय. उल्लेखनीय म्हणजे, २०१४ साली मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या सरकामध्ये नऊ महिला खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. यावेळी मात्र ही संख्या घटलेली दिसतेय.
२०१४ साली नजमा हेपतुल्ला, सुषमा स्वराज, उमा भारती, अनुप्रिया पटेल, मनेका गांधी आणि कृष्णा राज या महिलांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यंदा मात्र या महिला नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही.
निर्मला सीतारमण - अर्थ मंत्रालय आणि कार्पोरेट व्यवहार
माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांना अर्थमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. त्यामुळे येत्या महिन्यात निर्मला सीतारमण यांना येत्या महिन्यात अर्थसंकल्प सादर करावा लागेल.
स्मृती इराणी - महिला बालकल्याण मंत्रालय आणि कापडउद्योग
यंदा अमेठी मतदारसंघात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांच्याकडे महिला बालकल्याण मंत्रालय आणि कापडउद्योग अशी जबाबदारी देण्यात आलीय.
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग
हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबच्या बठिंडा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार हरसिमरत कौर बादल शिरोमणि अकाली दलाच्या नेत्या आहेत. गेल्या सरकारमध्येही त्या कॅबिनेट मंत्री होत्या.
साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास (राज्यमंत्री)
फतेहपूर मतदार संघाच्या ५२ वर्षीय खासदार साध्वी निरंजन ज्योती यांनी राज्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. त्यांच्याकडे ग्रामीण विकासाची जबाबदारी देण्यात आलीय. गेल्या सरकारमध्ये त्या केंद्रीय खाद्यप्रक्रिया उद्योग मंत्री होत्या. यंदाच्या प्रयागराज कुंभमेळ्यात साध्वी निरंजन ज्योती यांना 'निरंजन आखाड्याच्या महामंडलेश्वर' अशी पदवीही प्रदान करण्यात आली होती.
रेणुका सिंह सरुता - आदिवासी (राज्यमंत्री)
छत्तीसगडच्या सरगुजा मतदारसंघातील खासदार रेणुका सिंह सरुता यांना आदिवासी राज्यमंत्रीपदाचा कार्यभार मिळालाय.
देबाश्री चौधरी - महिला बालकल्याण (राज्यमंत्री)
पश्चिम बंगालचाय रायगंज मतदारसंघातून खासदार देबोश्री चौधरी यांना महिला बालकल्याण (राज्यमंत्री) पदभार सोपवण्यात आलाय.