नवी दिल्ली - हेल्मेट सक्तीचा विषय कायमच चर्चेत असतो. हेल्मेट घालून दुचाकी चालवणे दुचाकीस्वारांच्या भल्याचे असते. दरवर्षी हजारो दुचाकीस्वारांचा हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात मृत्यू होतो. त्यामुळे आता हेल्मेट घालणे हळूहळू देशात सगळीकडेच बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो. हेल्मेट घालणे बंधनकारक असले, तरी अनेकवेळा दुय्यम दर्जाचे हेल्मेट बाजारात विकले जाते आणि स्वस्तात मिळत असल्यामुळे दुचाकीस्वारांकडून त्याची खरेदी केली जाते. पण आता हेल्मेटच्या गुणवत्तेवरून नवे नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करून हेल्मेटची निर्मिती न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार १५ जानेवारी २०१९ पासून केवळ आयएसआय प्रमाणित हेल्मेटच विकली जाऊ शकतात. जर हेल्मेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी याचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. जर कोणी दोषी आढळले, तर त्याला दोन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हेल्मेटची विक्री करणारे आणि त्याचे साठवणूक करणाऱ्यांनाही हे नियम लागू करण्यात आले आहेत.


या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही अटक वॉरंटशिवायही अटक केली जाऊ शकते.  आयएसआय प्रमाणित नसलेली हेल्मेट दुचाकीस्वारांच्या कोणत्याही कामाची नाहीत. त्यामुळे त्याची निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, असे हेल्मेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेनेही म्हटले आहे.


गुणवत्ता निकष काय?
१५ जानेवारीनंतर केवळ आयएसआय प्रमाणित हेल्मेटच विकले जाऊ शकतात
हे हेल्मेट ब्युरो ऑफ इंडियन स्टॅडर्ड्सच्या IS 4151:2015 मानकांवर आधारित असले पाहिजेत
हेल्मेटचे वजन १.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये
आयएसआय प्रमाणित नसलेले हेल्मेट विकणे आणि साठवणूक करणे बेकायदा
दुचाकी चालवताना औद्योगिक वापरासाठीचे हेल्मेट वापरणाऱ्यांवर होणार कारवाई