`मोदी सरकारकडे पैसाच उरला नसल्याने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्यात`
हे सरकार सर्व मौल्यवान मालमत्ता विकण्याशिवाय आणखी काय करणार?
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या तिजोरीत पैसेच उरले नसल्याने एअर इंडिया कंपनी विक्रीसाठी काढण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली. एअर इंडियातील १०० टक्के हिस्सा विकणार असल्याची माहिती सोमवारी केंद्र सरकारतर्फे संसदेत देण्यात आली. या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी म्हटले की, जेव्हा सरकारच्या हातात पैसे नसतात तेव्हा असे केले जाते. सध्यादेखील भारत सरकारच्या तिजोरीत पैसे उरलेले नाहीत. अर्थव्यवस्थेचा विकासदर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. 'मनरेगा'सारख्या योजनांचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. अशावेळी हे सरकार सर्व मौल्यवान मालमत्ता विकण्याशिवाय आणखी काय करणार, अशी टीका कपिल सिब्बल यांनी केली.
सध्याच्या घडीला एअर इंडियावर जवळपास ५८ हजार कोटींचे कर्ज आहे. मध्यंतरी केंद्र सरकाने निधी पुरवून एअर इंडियाचे पुनरुज्जीवन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यानंतरही एअर इंडियाच्या परिस्थितीत फरक पडला नव्हता.
त्यामुळे आता सरकारपुढे एअर इंडिया विकण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. तखरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी १७ मार्च २०२० अखेरीची तारीख आहे. याचबरोबर सरकारने एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन सरकारी अनुदानित कंपन्यासाठीही बोली मागवल्या आहेत. बोली प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत माहिती देण्यात येईल.
जेआरडी टाटा यांनी १९३२ साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. मात्र, १९५३ साली सरकारने कंपनीचे सार्वजनिकीकरण करत टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली होती.