नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. पण लॉकडाऊनदरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात येत असल्याचं चित्र आहे. एअर इंडिया विमानातील भांडणापासून ते मोदी सरकारच्या फ्री मास्क योजनेपर्यंत अनेक फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. आता मोदी सरकारच्या महत्त्वपूर्ण आयुष्मान योजनेच्या  (Ayushman Yojana) ऑफिशियल वेबसाईटची चुकीची लिंक शेअर होत असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र सरकारकडून या लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या चुकीच्या मेसेजमध्ये ayushman-yojana.org ही आयुष्यमान भारत योजनेची अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात येत आहे. 


मात्र 'पीआयबी' या वृत्तसंस्थेच्या फॅक्ट चेक टीमकडून या व्हायरल होत असलेल्या मेसेजची सत्यता पडताळण्यात आली. त्यानंतर 'पीआयबी'कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्हायरल मेसेज खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे की, https://pmjay.gov.in ही एकमेव अधिकृत वेबसाईट आहे. लोकांनी या योजनेच्या नावाचा वापर करणाऱ्या इतर बनावट वेबसाईटमुळे गोंधळ करुन न घेण्याचं आवाहन केलं आहे.



या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने सोशल मीडियावरही स्पष्टीकरण दिलं आहे.  ayushman-yojana.org या वेबसाईटला आयुष्मान योजनेची अधिकृत वेबसाइट असल्याचं सांगत, लोकांची दिशाभूल केली जात असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. कृपया आयुष्यमान योजनेची अधिकृत वेबसाईट pmjay.gov.in हीच असल्याचं लक्षात ठेवा. याशिवाय इतर कोणतीही वेबसाईट सरकारशी संबंधित नाही, असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे.