नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात संवाद साधत आहेत. या कार्यक्रमासाठी देशभरातील २ हजार विद्यार्थी सामील झाले आहेत. तणावमुक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'परीक्षा पे चर्चा'मध्ये मोदींनी तुमचा मित्र तुमच्याशी बोलण्यासाठी आला असल्याचं सांगत, तरुणांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम अतिशय जवळचा असल्याचंही ते म्हणाले. अनेक कार्यक्रमांवेळी अनेक युवकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. युवकांशी बोलताना अतिशय सकारात्मक वाटतं. युवा पिढीकडून खूप काही शिकायला मिळतं. हे दशक देशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. नव्या संकल्पनांसह पुढे जायचं असल्याचं ते म्हणाले.


या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारण्यापूर्वी, मोदींना विद्यार्थ्यांना 'परीक्षा पे चर्चा'मध्ये  #withoutfilter चर्चा करुया असंही सांगितलं. 


कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्यांनीने मूड ऑफ होण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मोदींनी विद्यार्थ्यांचा मूड ऑफ व्हायलाच नको असं सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी चांद्रयान प्रक्षेपणाचं उदाहरण दिलं. चांद्रयान मोहीम यशस्वी होईलच याची खात्री नव्हती. त्यामुळे चांद्रयान प्रक्षेपणावेळी न जाण्याचं मला अनेकांनी सांगितलं होतं. पण मोहिम अयशस्वी झाली तर काय? यासाठीच मी तिथे गेलो असल्याचं ते म्हणाले. प्रक्षेपणावेळी शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील तणाव, काहीतरी अघटित घडलंय हे समजत होतं. पण मी त्यांना चिंता करू नका असे सांगून तेथून निघालो. मला रात्रभर झोप येत नव्हती. सकाळी मी कार्यक्रमात बदल करुन सर्व शास्त्रज्ञांची बैठक घेतली, भावना व्यक्त केल्या, कौतुक केलं, त्याने देशाचं आणि शास्त्रज्ञांचं सगळंच वातावरण बदललं असल्याचं ते म्हणाले. अपयशातूनही यशाचा धडा शिकू शकतो. अपेक्षापूर्ती न झाल्याने मूड ऑफ होतो असं ते म्हणाले.  


अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आशा-निराशेचा खेळ सुरुच असतो. असफलतेतून सफलतेचा धडा घ्यायला हवा. प्रयत्नात उत्साह आणू शकतो, अपयशाचा सामना करता, म्हणजे तुम्ही यशाकडे वाटचाल करत आहात. तिथेच थांबलात तर काहीही होऊच शकत नाही. ते तुम्हीच ठरवले पाहिजे, असा कानमंत्रही मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे.


बोर्डाच्या परीक्षेतील तणाव दूर व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यातील १ हजार ५० विद्यार्थ्यांची निवड निबंध स्पर्धेद्वारे घेण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.