मध्य प्रदेश: आता सरकारी घरांच्या टाईल्सवरही मोदी..
आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये हे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानेच देण्यात आल्याचे म्हटले आहे.
भोपाळ : रस्त्यावरच्या फलकापासून ते गांधींजींच्या चरक्यापर्यंत मोदींची शैलीदार छबी झळकल्याचे भारतीयांनी पाहिले. पण, आता एक पाऊल पुढे टाकत मध्यप्रदेशमध्ये चक्क २.८६ लाख लोकांच्या घरांच्या टाईल्सवरही मोदी झळकणार आहेत. मोदींच्या छबीसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचीही छबी झळकणार आहे. पंतप्रधान घर योजनेंतर्गत (PMAY) जी घरे बांधण्यात येतील त्या घरांच्या टाईल्सवर मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांची छायाचित्रे चिटकवली जातील. प्राप्त माहिती अशी की, या टाईल्सही आकाराने बऱ्याच मोठ्या असणार आहेत.
घर घर मोदी, टाईल्सवरही मोदी
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'PMAY'अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक घरात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची छबी असलेल्या दोन टाईल्स लावण्यात येतील. यातील एक घराच्या प्रवेशद्वारावर आणि एक किचनमध्ये असणार आहे. शहर प्रशासनाने ४ एप्रिलला दिलेल्या आदेशानुसार मध्यप्रदेशातील नगर विकासच्या सर्व आयुक्त आणि मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, गृहयोजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये नेत्यांची छायाचित्रे लावावीत.
सर्व आयुक्तांना सीईओचे आदेश
दरम्यान, प्रशासनाने सर्व जिल्ह्यांना एक नमुना टाईल्स आणि सोबत पत्र पाठवले आहे. जेनेकरून हे नक्की करण्यात येईल की, टाईल्स नेमकी कोणत्या ठिकाणी लावावी. या टाईल्सवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिवराजसिंहचौहान यांची छायाचित्रे, सबका सपना, घर हो आपना ही पंचलाईन आणि प्रधानमंत्री गृह योजनेचा लोगो आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशाने निर्देश
दरम्यान, राज्य़ातील सर्व आयुक्तांना टेंडर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे टेंडर टाईल्स बसविण्याचे कंत्राट घेण्यासंबंधी आहे. तसेच, आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये हे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानेच देण्यात आल्याचे म्हटले आहे.