नवी दिल्ली : साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालानं अयोध्येतील राम मंदिरावर शिक्कामोर्तब केला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असल्याचं कोर्टानं सांगितंल आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिर बांधण्यासाठी पुढच्या तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करण्याचे निर्देशही कोर्टानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा कोर्टानं फेटाळला असला तरी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच पाच एकर जमीन देण्याचे आदेशही दिले आहेत. पुरातत्व विभागानं दिलेल्या अहवालातील पुराव्यांच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली. 'संघ आंदोलन करणारी संघटना नाही. संघ मनुष्य बनवणारी संघटना असल्याचं त्यानी म्हटलं आहे. अयोध्येवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पुढे काशी आणि मथुरा का ?'.असा प्रश्न विचारल्यानंतर भागवत यांनी ही प्रतिक्रिया दिली.


'सुप्रीम कोर्टाने देशाची जनभावना आणि आस्थेला न्याय दिल्यामुळे संघ याचं स्वागत करतो. या सुनावणीत राम जन्मभूमीशी संबंधित सर्व पक्षांना धैर्याने ऐकलं गेलं. सगळ्या पक्षाच्या वकिलांचं आम्ही अभिनंदन करतो. बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. सरकार आणि सामान्य लोकांच्या प्रयत्नांचं अभिनंदन करतो. विजय आणि पराभवाच्या दृष्टीने या निर्णयाकडे नाही पाहिलं पाहिजे.'