भोपाळ: मध्य प्रदेशात सध्या गाजत असलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणाची व्याप्ती फार मोठी असल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्यांची चौकशी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी शुक्रवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवराजसिंह चौहान यांच्या काळात हा सर्व प्रकार सुरु झाला. यामध्ये भाजपचे विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते गुंतले आहेत. यासाठी त्यांचे ब्रह्मचर्य कारणीभूत आहे. त्यामुळेच हे सर्व नेते हनीट्रॅपमध्ये अडकले. किमान आता तरी संघाच्या नेत्यांनी लग्न करायला पाहिजेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लग्न करावे, असा सल्ला मानक अग्रवाल यांनी दिला.


तसेच पोलिसांच्या विशेष पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामध्ये हा सर्व प्रकार शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना सुरु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सेक्स स्कँडल केवळ मध्य प्रदेशपुरता मर्यादित नसून तब्बल पाच ते सहा राज्यांमध्ये त्याची व्याप्ती असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. 




काय आहे हनीट्रॅप प्रकरण?


मध्य प्रदेशात एका टोळीने वेश्या आणि महाविद्यालयीन मुलींचा वापर करून प्रशासनातील बडे अधिकारी आणि राजकारण्यांना जाळ्यात ओढले. यानंतर संबंधितांचे सेक्स चॅट, आक्षेपार्ह व्हीडिओ आणि संभाषणाचे पुरावे तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात या सगळ्यासाठी वापरण्यात आलेले २०० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास १००० सेक्स चॅट, आक्षेपार्ह व्हीडिओ आणि संभाषणे आढळून आली आहेत. 


एसआयटी पथकाचे प्रमुख संजीव शामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे. या प्रकरणात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे नेते गुंतल्याचे त्यांनी सांगितले. 


तत्पूर्वी बुधवारी पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये श्वेता जैन, बरखा सोनी, आरती दयाल आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. यापैकी बरखा सोनी काँग्रेसच्या आयटी सेलचे माजी प्रमुख अमित सोनी यांची पत्नी आहेत. 


तर श्वेता जैन या एक स्वयंसेवी संस्था चालवतात. पोलिसांच्या माहितीनुसार एका स्थानिक भाजप नेत्याचे घर त्यांनी भाड्याने घेतले होते. याठिकाणी सेक्स स्कँडल सुरु होते. त्यांचे अनेक राजकारण्यांशी संबंध होते. मराठवाड्यातील एका बड्या नेत्याशीही त्यांची जवळीक असल्याचे सांगितले जाते. 


पोलीस चौकशीत श्वेता जैन यांनी सेक्स स्कँडलच्या कार्यपद्धतीबद्दल खुलासा केला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकारण्यांना आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणींचा वापर केला जायचा. हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलींना ऐषोआरामी जीवनशैलीचे आमिष दाखवून यासाठी राजी केले जायचे. यासाठी आपण स्वत: अनेक मुलींना राजी केल्याची कबुलीही श्वेता जैन यांनी दिली. 


या सगळ्याच्या क्लीप्स तयार करून अधिकारी आणि राजकारण्यांना ब्लॅकमेल केले जायचे. या माध्यमातून श्वेता जैन आणि आरती दयाल यांनी अनेक सरकारी कंत्राटे मर्जीतील कंपन्यांसाठी पदरात पाडून घेतली होती. तसेच सेक्स स्कँडलच्या माध्यमातून तयार झालेल्या संपर्कांच्या जोरावर श्वेता जैन यांनी राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचीही माहिती समोर आली आहे.