नवी दिल्ली : पुलवामातील शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. पुलवामातील शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणले. महाराष्ट्रातल्या वीरपुत्रांचे पार्थीव उद्या सकाळी नागपुरात आणणार आहेत. शहीद संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्यावर उद्या बुलढाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे यावेळी विमानतळावर उपस्थित होते. या सर्व शहिदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मानवंदना देणार आहेत. सर्व शहिदांचे पार्थिव उद्या सकाळी आपापल्या मूळ ठिकाणी रवाना करण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही जवानांचे पार्थिवही उद्या सकाळी पुण्याला दाखल होणार आहेत. 





COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा या ठिकाणी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झालेत. या हल्ल्याचा देशातून तीव्र निषेध होतो आहे. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. आता या जवानांची पार्थिव दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आली आहेत. या ठिकाणाहून ही पार्थिव जवानांच्या मूळ गावी रवाना होतील.



काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हेही दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित आहेत. तत्पूर्वी लष्कराच्या आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. 'आमच्या आत्म्यावर घाव बसलाय, आजचा दिवस दु:खाचा दिवस आहे. आम्ही सर्व विरोधक सरकारसोबत आहोत, शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केलाय. शहीद जवानांचे पार्थिव उद्या त्यांच्या मूळगावी रवाना केले जाणार आहेत. 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना सज्जड इशारा दिलाय. पुलावाम्यात सीआरपीएफवर भ्याड हल्ला करून दहशतवादी संघटनांनी मोठी चूक केली. त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावीच लागेल असं पंतप्रधान म्हणाले. सैन्यदलांना कारवाईसाठी संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचं ते म्हणाले. दहशतवाद्यांना चिरडणार असा निर्धार त्यांनी केला. भिकेला लागलेल्या शेजारी राष्ट्राचे मनसुबे भारत कधीही पूर्ण होऊ देणार नाही असंही मोदींनी स्पष्ट केलंय.