दिल्ली हादरली! मच्छरांसाठी लावलेल्या कॉइलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
6 Killed Due to Mosquito Coil: पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना घरामध्ये 6 जणांचे मृतदेह आढळून आले.
6 Killed In Delhi Due to Mosquito Coil: नवी दिल्लीमधील शास्त्री पार्क परिसरामध्ये आज पहाटेच्या सुमारास एका धक्कादायक घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. या परिसरामधील एका घराला लागलेल्या आगीमध्ये कुटुंब मृत्यूच्या दाढेत ढकललं गेलं. येथील पोलिस स्थानकामध्ये पीसीआर कॉल आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता 6 जणांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. 3 जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. मरण पावलेल्यांमध्ये 4 पुरुष, एक वयस्कर महिला आणि एका दीड वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घराला लागलेली आग ही मच्छर पळवण्यासाठी लावलेल्या कॉईलमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपाचारांसाठी दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगा असून त्याचं वय 15 वर्ष इतकं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचं वय 45 वर्षांच्या आसपास असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अन्य एका 22 वर्षीय जखमी तरुणाला प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छर पळवण्यासाठी जाळलेली कॉइल घरातील गादीवर पडल्याने आग लागली. अवघ्या काही वेळात ही आग वाढली आणि घरात मोठ्या प्रमाणात धूर झाला. घराचं दार फारच छोटं असल्याने आणि संभ्रमावस्थेत घरातून बाहेर पळण्यास या कुटुंबातील अनेकांना अपयश आलं. त्यामुळेच गुदमरुन आणि आगीच्या ज्वालांमध्ये होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला.
इतर ठिकाणीही अग्नितांडव
मरण पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आजच सकाळी दिल्लीमधील वजीरपूरमध्येही आग लागल्याची घटना घडली. येथील एका फॅक्ट्रीला आग लागल्याचं समजल्यानंतर अग्निशामन दलाच्या तब्बल 25 गाड्या घटास्थळी पोहोचल्या होत्या. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. दिल्लीमधील मुखर्जी नगरमधील निरंकारी कॉलिनीमध्ये शुक्रवारी पहाटे गादीच्या गोदामाला सुद्धा आग लागली होती. ही आग विजवण्यासाठी अग्निशामन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग नियंत्रणात आल्यानंतर येथील आर्थिक नुकसानीची पहाणी करण्यात आली. या ठिकाणीही जिवितहानी झाली नाही.