Crime News In Marathi: सुनेने घरातील काम करण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या सासूने केलेले कृत्य पाहून पोलिसही चक्रावले आहेत. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अमरोहामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनेच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी (Police) सासू-सासरे आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात सासूने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, साक्षी-पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सासूला अखेर ताब्यात घेतले आहे. (Women Killed Daughter in law)


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूनेचे नाव कोमल असं असून तिचे माहेर श्रीमंत होते. त्यामुळं ती घरात कोणतेही काम करत नव्हती. याचाच सासूला राग होता. तसंच, सासू अनेकदा कोमलला माहेराहून हुंडा घेऊन येण्याची मागणी करत होती. मात्र ती त्यांना नकार देत होती. त्यामुळं त्यांच्यात सतत वाददेखील होत होते. याच वादातून सासूने सुनेच्या डोक्यात गोळी मारुन तिची हत्या केली. सुनेच्या खुनानंतर सासूने बनाव करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 


सासूने रचला बनाव


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आरोपींनी कोमलच्या डोक्यावर मार लागला असल्यामुळं रुग्णालयात दाखल केल्याचा बनाव रचला होता. मात्र कोमलच्या मृत्यूनंतर तिच्या आईने सासू-सासऱ्यांविरोधात हुंडाबळीची तक्रार दाखल केली. कोमलच्या आईने केलेल्या आरोपांनुसार, सासू कोमलला सतत हुंड्यासाठी त्रास देत होती. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर कुटुंबीयांची व आजूबाजूच्या दुकानदारांची चौकशी केली तेव्हा सर्व प्रकाराचा उलगडा झाला. 


दुकानदारांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला काहीतरी फेकताना पाहिलं होतं. हाच धागा पकडत पोलिसांनी कोमलच्या सासूला ताब्यात घेतले व तिची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबुल केला आहे. 


सासूने दिली कबुली


सासूने संधी साधत सुनेची हत्या केली. त्यानंतर सुनेचा मृतदेह रस्त्याच्या किनारी फेकून दिला. सुनेच्या माहेरी व शेजाऱ्यांना घरात दरोडेखोरांनी हल्ला केला असून त्यातूनच त्यांनी वार केले, असा बनाव रचला. तर, नंतर सुनेचा आपणच शोध घेतला असं दाखवून तिला रुग्णालयात दाखल करण्याचे खोटे नाटक रचले. मात्र, शेजारी व सुनेच्या माहेरच्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सासूचे बिंग फुटले आहे. 


पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा व हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच, सासूला मदत करणाऱ्या अन्य तीन आरोपींनाही अटक केली आहे.