मुंबई: एखाद्या लहान मुलाला पोलिओ झाला, तर तो एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ शकेल असा विचार देखील कधी कोणी करणार नाही, परंतु ही गोष्ट एका गरीब घरातील मुलीने खरी करुन दाखवली आहे. विल्मा रुडॉल्फचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. ती फक्त 4 वर्षाची होती तेव्हा तिला न्यूमोनिया झाला आणि त्यानंतर तिला पोलिओ झाला. ज्यामुळे ती तिच्या पायावरती धड उभी देखील राहू शकत नव्हती. डॉक्टरांनी तर तिच्या पायावर 'ब्रेस' लावला आणि सांगितले की, ती पुन्हा कधीही चालू शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु आपल्या गरीबीला आणि आपल्या अपंगत्वाला न जुमानता विल्मा रुडॉल्फने आपल्या जिद्दीच्या जोरावर आपल्या देशासाठी ऑलिम्पिकमध्ये एक नाही, दोन नाही तर चक्कं तीन सुवर्णपदके जिंकली. विल्मा रुडॉल्फने आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि आपल्या कर्तुत्वाने हे सिद्ध केली या जीवनात अशक्य काहीच नाही.


विल्मा ब्रेसवर चालत असे


विल्मा रुडॉल्फचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथे एका गरीब घरात झाला. विल्माचा जन्म 1939 साली झाला. 21 भावंडांमध्ये ती 19वी होती. ती अकाली जन्मली होती, ज्यामुळे ती खूप अशक्त होती. जेव्हा विल्मा तीन वर्षांची झाली तेव्हा तिच्या कुटुंबाला समजले की तिला पोलिओ आहे, ज्यामुळे ती नीट चालू शकत नाही. ज्यामुळे नंतर विल्मा पायात ब्रेसवर चालत होती.


प्रत्येकजण विनोद करायचा, पण तिने हार मानली नाही


रुडॉल्फ जेव्हा लहानपणी तिच्या वर्गात खेळाबद्दल बोलायची तेव्हा लोकं तिची टींगल उडवायचे आणि म्हणायचे, तुला नीट उभे देखील राहाता येत नाही आणि तु खेळाबद्दल बोलतेय. फक्त वर्गच नाही तर इतर कोणीही तिचे हे असे शब्द ऐकले की, ती धावेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. तिला ऑलिम्पिकमध्ये धावायचे आहे हे ऐकून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.


तिच्यासोबत घडलेल्या गोष्टी ती आईसोबत शेअर करायची. विल्माने एकदा आपल्या आईला विचारले, "आई मी जगातील सर्वात वेगवान धावपटू होऊ शकते का? तेव्हा आपल्या लेकीची जिद्द पाहून आई तिला म्हणाली की, "बाळा तू काहीही करू शकतेस, या जगात काहीही अशक्य नाही." आईने विल्माला तिच्या प्रत्येक पावलावर साथ दिली. त्याचा परिणाम असा झाला की विल्माने ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकली.


प्रत्येक पावलावर आईची साथ


डॉक्टरांनीही विल्माच्या आईला सांगितले होते की, ती कधीही आपल्या पायावर चालू शकणार नाही. पण विल्माच्या आईने हार मानली नाही. आपल्या मुलीचे दुःख पाहून तिच्या आईने ठरवले की ती स्वतः तिच्या मुलीवर उपचार करेल. रुडॉल्फची आई तिला आठवड्यातून दोनदा शहरापासून 50 मैलांवर असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असे. उर्वरित दिवस ती स्वतः घरीच उपचार करायची.


वयाच्या 12 व्या वर्षी विल्माने पुन्हा चालायला सुरुवात केली. विल्माच्या आईने ठरवले की, ती त्याला अ‍ॅथलेटिक्स साठी तयार करेल. विल्माचे समर्पण आणि मेहनत पाहून तिच्या शाळेनेही नंतर तिला पाठिंबा दिला.



1953 मध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या प्रवासाची सुरुवात


विल्माच्या अ‍ॅथलेटिक्सचा प्रवास 1953 मध्ये सुरू झाला. प्रथमच आंतरशालेय स्पर्धेत तिने भाग घेतला. या शर्यतीत विल्मा शेवटची होती. परंतु या पराभवाने विल्माचा आत्मविश्वास डळमळीत झाला नाही. तिने स्वत:वर पुन्ही तितकीच मेहनत घेतली. अखेर 8 शर्यतींमध्ये अपयशी ठरल्यानंतर तिने नवव्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. या विजयाने विल्माचा सुवर्ण प्रवास सुरू झाला.


1956 यूएस ऑलिम्पिक ट्रॅक आणि फील्ड चाचण्यांमध्ये सहभाग


विल्मा रुडॉल्फने कठोर परिश्रम केले आणि वयाच्या 14 व्या वर्षी टेनिसी समर कॅम्पमधील सर्व धावण्याच्या स्पर्धा जिंकल्या. 1956 मध्ये, विल्माने यूएस ऑलिम्पिक ट्रॅक आणि फील्ड ट्रायल्समध्ये भाग घेतला, जिथे तिने मेलबर्न ऑलिम्पिकच्या 200 मीटर शर्यतीसाठी पात्र होण्यासाठी चमकदार कामगिरी केली. रुडॉल्फने मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकले.


रोम ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला


1960 च्या ऑलिम्पिक खेळ रोम येथे आयोजित करण्यात आले होते. विल्माने 100 मी, 200 मी आणि 4×100 मी या खेळांमध्ये भाग घेतला. 200 मीटरमध्ये विल्माने ऑलिम्पिक विक्रमासह पदक जिंकले. तिने 11.0 सेकंदात 100 मीटरमध्ये विश्वविक्रमही केला पण तो स्वीकारला गेला नाही. तिच्या या कामगिरीवर वाऱ्याचा अधिक प्रभाव असल्याचे सांगण्यात आले. परंतु तिला त्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.


200 मीटरच्या दुसऱ्या शर्यतीत विल्माने जुट्टाचा पराभव करून तिचे दुसरे सुवर्णपदक जिंकले. जुट्टा हयानेशी ही सर्वात वेगवान खेळाडूंपैकी एक होती आणि ती कधीही कोणती शर्यतीत हरली नव्हती. 


त्यानंतर तिसरी शर्यत 400 मीटर बॅटन रिले शर्यत होती. येथेही तिची जुट्टा हयानेशी स्पर्धा होती. रिले स्पर्धेत सर्वात वेगवान धावपटू सर्वात शेवटच्या स्थानावर असतो आणि येथे तीन धावपटू धावल्यानंतर बेटल चौथ्या आणि सर्वात वेगवान खेळाडूला देण्यात येतो. त्यामुळे विल्मा ही चौथ्या स्थानावरती होती, तर तिच्या विरुद्ध जुट्टा हयानेशी चौथ्या क्रमांकावर होती.



या सामन्यदरम्यान विल्माच्या हातातात जेव्हा तिसऱ्या खेळाडूने बेटल दिला तेव्हा तो खाली पडला, त्यावेळेला विल्माने जोट्टाला पुढे जाताना पाहिले तेव्हा ती लगेच उठली आणि संपूर्ण प्राण पणाला लावून ती पळाली आणि त्या स्पर्धेत देखील तिने सुवर्णपदक जिंकले.


ही ऐतिहासिक घटना होती, कारण विल्माने इतिहास घडवला. तिने जगातील सर्वात वेगवान महिला होण्याचे तिचे स्वप्न साकार केले आहे.


एका अपंग महिलेचा हा पराक्रम इतिहासात नोंदवला गेला आहे आणि जे आयुष्यात जिंकण्याची आकांक्षा बाळगतात त्यांच्यासाठी ती एक मोठी प्रेरणा आहे. तिची हा कहाणी सगळ्यांसाठी मोटीवेशन आहे.


जे लोक आपल्या अपयशाची कारणे देतात, परिस्थितीला दोष देतात, अशा लोकांसाठी विल्मा खरंच एक कर्तृत्ववान व्यक्तीमत्व आहे. यश हे धैर्यवान आणि दृढनिश्चयी लोकांचे गुलाम आहे, हे विल्मा रुडॉल्फने सिद्ध केले आहे.