Crime News :  या जगात पैशापेक्षा कोणीच मोठं नाही असं कायम म्हटलं जातं. अनेकदा याच पैशावरुन (Money) कुटुंबियांमध्ये कलह निर्माण झाल्याचे आपण पाहिलं असेल. गरीब असो की श्रीमंत प्रॉपर्टीसाठी प्रत्येकजण भांडताना दिसत असतो. मात्र मध्य प्रदेशात (MP Crime) एका पठ्ठ्याने त्याचे वडील आणि भाऊ जिवंत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी गावभर पसरवली. मुलाने आपले वडील आणि भाऊ जिवंत नसल्याचे सांगून मुंडन केले. यानंतर शोकसंदेश छापून ती पत्रके गावात इतर नातेवाईकांना वाटली. नंतर वडिलांना त्यांच्या लहान मुलाच्या कृत्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. वडिलांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी  (MP Police) आरोपीला न्यायालयात हजर केले आणि त्याची रवानगी कारागृहात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यातील जमुनिया गावात हा सर्व प्रकार घडला आहे. हा पराक्रम गयाप्रसाद पटेल यांच्या मुलाने केला आहे. गयाप्रसाद पटेल यांना दोन मुले आहेत. त्यातल्या लहान भावाने वडील आणि मोठा भाऊ मरण पावल्याचे सांगून  मुंडण करून घेतले. त्यानंतर शोकसंदेशाचे पत्रक देखील छापले.  "मला अत्यंत दुःखाने कळवावे लागते की माझे आदरणीय वडील श्री. गयाप्रसाद पटेल आणि बंधू कमलसिंग पटेल यांचे 3 मे रोजी निधन झाले. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी 18 मे रोजी गंगाजली पूजन व जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. कृपया या आणि दिवंगत आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करा," असे या शोकसंदेशात म्हटलं होतं.


त्यानंतर गयाप्रसाद आणि त्यांच्या मोठ्या मुलाचे हितचिंतक 18 मे रोजी घरी पोहोचले. दोघांनाही जिवंत पाहून लोकांनाही धक्का बसला. गयाप्रसाद आणि कमल सिंह पटेल दोघेही समोर जिवंत बसलेले दिसले. लोकांनी सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर गयाप्रसाद यांनी 19 मे रोजी त्यांचा लहान मुलगा विमल पटेल याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. 8 मे रोजी विमलने बाईक हिसकावून घेतली होती. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर विमलने मुंडण झाले. वडील आणि मोठा भाऊ मरण पावल्याचे गावातील लोकांना सांगितले.


पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून माहुलझीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. तपासात पोलिसांनी विमलकडून त्याच्या वडिलांची दुचाकी, शोकपत्र आणि फोन जप्त केला आहे. आरोपीने यापूर्वी वडिलांना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले होते. त्यांचे शेतातील घर, ट्रॅक्टर बळकावला होता. त्यानंतर आठ मे रोजी तो बाईक हिसकावून घेऊन गेला होता. आरोपीला प्रथम न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


दरम्यान, आरोपी विमलीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आली आहे. विमल पटेलविरुद्ध नर्मदापुरममधील पिपरिया पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर माहुलझीर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हाही दाखल आहे.