Crime News : मध्य प्रदेशच्या (MP Crime) पन्ना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुतण्याने त्याच्या दोन चुलत काकांची गोळ्या घालून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुडिया गाव पोलीस ठाण्याच्या परिसरातील देवेंद्रनगरमध्ये हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. जुन्या वैमनस्यातून तीन भावांपैकी एकाच्या मुलाने दोन भावांची हत्या केली आहे. छोट्या गोष्टीवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट दोघांच्या हत्येमध्ये झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठा भाऊ चरण सिंग आणि त्याचा मुलगा शुभम सिंग राजपूत यांनी मिळून काका आणि महेंद्र उर्फ ​​बबलू आणि नरेंद्र सिंग राजपूत यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री नरेंद्र सिंह यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावली होती. मात्र मोठ्या भावाला बोलावण्यात आले नव्हते. यावरुनच हा वाद पेटला आणि दोघांना जीव गमवावा लागला.


रविवारी रात्री देवेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुडिया गावात जोरदार गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तपासात दोन जण ठार झाल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आणि दुसऱ्याचा शोध सुरू केला. दोन्ही मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पन्ना येथे पाठण्यात आले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी सांगितले की, आरोपीला लवकरच पकडण्यात येईल. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.


संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी सांगितले की, "तीन भावांच्या कुटुंबात जमिनीच्या जुन्या वादावरुन आणि वाढदिवसाला न बोलावण्यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद झाले होते. मात्र रविवारी हा वाद इतका वाढला होता की मोठा भाऊ आणि त्याच्या मुलाने दोन काकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला देखील जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे." 


दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मृत भावांचा पुतण्या शुभम सिंग आणि त्याचे वडील चरणसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. पोलिसांनी आरोपी शुभम सिंग याला अटक करत त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.