MP Crime : मध्य प्रदेशात (MP News) लाचखोरीशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जबलपूरच्या रेठी तहसीलमधील बिल्हारी भागात सोमवारी एका तलाठ्याने 4500 रुपयांची लाच खाल्ली आहे. लाच खाणे हे सहजासहजी वापरलं जाणारं वाक्य आहे. पण मध्य प्रदेशातल्या या तलाठ्याने चक्क नोटाच चावून गिळल्या आहेत. कटनी जिल्ह्यात जबलपूर लोकायुक्तांचे (Lokayukta) पथक लाचखोरीच्या तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी पोहोचले होते. समोर लोकायुक्तांना पाहून तलाठ्याने लाच घेतलेली रक्कम खाऊन टाकली आहे. तलाठ्याने एकामागून एक 500 रुपयांच्या नऊ नोटा गिळल्या आहेत. यानंतर लोकायुक्तांसोबत आलेल्या हवालदाराने (MP Police) तलाठ्याच्या तोंडात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तलाठ्याने त्याचे बोटच चावले. लोकायुक्तांच्या पथकाने तलाठ्याला रुग्णालयात नेले आणि तिथे जाऊन पैसे बाहेर काढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिल्हारी कटनी जिल्ह्यातील हलका गावात हे सगळं प्रकरण घडलं आहे. गावात तलाटी म्हणून तैनात असलेल्या गजेंद्र सिंह यांनी तक्रारदार चंदनसिंग लोधी यांच्याकडे एका जमिनीच्या प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी चंदन सिंह यांनी जबलपूर लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांचे पथक बिल्हारी गावात पोहोचले. वृत्तानुसार पटवारी गजेंद्र सिंह याला 4,500 रुपयांची लाच घेताना लोकायुक्तांच्या पथकाने पाहिले. तपास पथक त्या नोटा ताब्यात घेण्याआधीच तलाटी गजेंद्र सिंग याने लाचेच्या नोटा गिळून टाकल्या.


सोमवारी जबलपूर लोकायुक्तांच्या सात सदस्यीय पथकाने लाचखोर गजेंद्र सिंग याला साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पाहिले होते. तलाठ्याने संधी साधून लाचेच्या स्वरूपात मिळालेल्या नोटा एकामागून एक खावून टाकल्या. कोणालाही काही कळायच्या आतच तलाठ्याने नोटा गिळल्या होत्या. हा सगळा प्रकार पाहून सर्वच हादरले. त्यांनी लाचखोर तलाठ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी लाखो प्रयत्न करूनही एक नोटही बाहेर काढता आली नाही. त्यानंतर बऱ्याच वेळाने गजेंद्र सिंगच्या तोंडातून नोटा बाहेर येऊ लागल्या.



नेमकं काय घडलं?


10 जुलै रोजी बारखेडा येथील रहिवासी चंदनसिंग लोधी यांनी तक्रार दाखल केली होती. तलाटी गजेंद्र सिंग याने चंदनच्या आजोबांच्या जमिनीचे सीमांकन करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच घेण्यासाठी गजेंद्रने चंदनला आपल्या खासगी कार्यालयात बोलावले होते. चंदनसिंग लोधी यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर लोकायुक्त निरीक्षकांनी तलाठ्याला पकडण्यासाठी पथकाने सापळा लावला होता. मात्र त्याचवेळी गजेंद्रने ही रक्कम गिळून टाकली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन या नोटांचे तुकडे जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.