वाळू माफियांना पकडायला गेलेल्या अधिकाऱ्याची चिरडून हत्या; रात्रभर नदीत पडून होता मृतदेह
मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
MP Crime : सरकारने कठोर कारवाई करुनही वाळू माफियांकडून सातत्याने वाळू चोरल्याच्या घटना समोर येत आहे. हे वाळूमाफिये अधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मध्य प्रदेशात वाळू माफियांनी एका अधिकाऱ्याची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात शनिवारी रात्री अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडून ठार करण्यात आलं.
मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात अवैध खाणकाम थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर वाळू माफिया ट्रॅक्टरसह पळून गेले. ही संपूर्ण घटना देवलोंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालपूर सोन नदीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. शुक्रवारी रात्री उशिरा प्रसन्न सिंग हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी गेले होते. त्यावेळी अवैध उत्खननाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर प्रसन्न सिंग यांनी पकडला.
त्याचवेळी ट्रॅक्टर चालकाने प्रसन्न सिंग यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवला. ट्रॅक्टरखाली चिरडले गेल्याने प्रसन्न सिंग हे जागीच ठार झाले. यानंतर आरोपीने तिथून ट्रॅक्टरसह पळ काढला. या सगळ्या प्रकारानंतर प्रसन्न सिंग यांचा मृतदेह नदीच्या परिसरातच पडला होता. तसेच सिंग यांच्या चालकानेही तिथून पळ काढला. प्रसन्न सिंग यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला अटक केली. आरोपी चालक शुभम विश्वकर्मा आणि ट्रॅक्टर मालक प्रशांत सिंग हे दोघेही मैहर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अवैध वाहतूक आणि उत्खननावर कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सरकारवर टीका केली आहे. "मध्य प्रदेशातील वाळू माफियांनी सरकारी अधिकाऱ्याला अशा प्रकारे चिरडून ठार मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. शिवराज सरकारच्या काळात फोफावलेल्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे ही परिस्थिती आली आहे. दिवंगत अधिकाऱ्याच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी, अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे," असे कमलनाथ यांनी म्हटलं आहे.